सहारा ग्रुपचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन

७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सहारा ग्रुपचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन

सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे बुधवारी, १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सहारा समूहाने निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली. ‘एक प्रेरणादायी आणि दूरदर्शी नेते असणारे सहाराश्री यांचे १४ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजता हृदय आणि श्वसनक्रिया बंद पडल्याने निधन झाले. हायपरटेन्शन आणि डायबिटीजमुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंतीशी त्यांनी दीर्घकाळ लढा दिला. त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,’ असे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

बिहारच्या अरारिया जिल्ह्यात १० जून, १९४८ रोजी जन्मलेले सुब्रत हे मोठे व्यावसायिक झाले. त्यांनी अर्थ, बांधकाम व्यावसायिक, प्रसारमाध्यमे आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. रॉय यांनी गोरखपूरमधील गव्हर्नमेंट टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी सन १९७६मध्ये ‘सहारा फायनान्स’ या चिट फंड कंपनीचा ताबा घेतला. त्यानंतर सन १९७८मध्ये त्यांनी त्या कंपनीचे रूपांतर ‘सहारा इंडिया’ परिवार या कंपनीत केले. अल्पावधीतच ही कंपनी बलाढ्य कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागली.

रॉय यांच्या नेतृत्वाखाली सहाराने विविध क्षेत्रांत आपले हातपाय पसरले. त्यांनी सन १९९२मध्ये राष्ट्रीय सहारा हे हिंदीभाषिक वर्तमानपत्र सुरू केले. त्यानंतर सन १९९२च्या सुमारास पुण्याजवळ त्याने महत्त्वाकांक्षी असा ऍम्बीव्हॅलीचा प्रकल्प उभा केला. त्यानंतर सहारा टीव्ही कंपनी स्थापन करून टेलिव्हिजन क्षेत्रातही प्रवेश केला. या कंपनीचे नाव नंतर ‘सहारा वन’ असे ठेवले. सहारा कंपनीने लंडनमधील ‘ग्रॉसवेनॉर हाऊस हॉटेल’ आणि न्यूयॉर्कमधील ‘प्लाझा हॉटेल’ या महत्त्वाच्या वास्तू विकत घेतल्यानंतर त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही झळकले.

एकेकाळी सहारा इंडिया परिवारात भारतीय रेल्वेच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच तब्बल १२ लाख कर्मचारी काम करत असत. त्यावेळी त्यांचा उल्लेख टाइम मॅगझिनमध्येही करण्यात आला होता. या कंपनीत तब्बल नऊ कोटी गुंतवणूकदार होते, असा कंपनीचा दावा होता. व्यवसायात उदंड यश मिळाल्यानंतर त्यांना कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला. सन २०१४मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सोबतच्या वादाच्या संदर्भात न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रदीर्घ कायदेशीर लढाई सुरू झाली.

हे ही वाचा:

कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!

मायकल जॅक्सनच्या ४० वर्षापूर्वीच्या जॅकेटची किंमत २.५ कोटी!

केरळातील पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्कार, हत्येप्रकरणी आरोपी अश्फाकला फाशी

कर्नाटकात परिक्षागृहात हिजाब घालण्यास मनाई!

रॉय यांनी तिहार तुरुंगात काही काळ व्यतीत करावा लागला. अखेरीस त्यांची पॅरोलवर सुटका झाली. सेबीने सहाराला गुंतवणूकदारांना अब्जावधी रुपये परत करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या उद्देशासाठी ‘सहारा-सेबी रिफंड खाते’ स्थापन केले होते. रॉय यांच्या कायदेशीर अडचणींमुळे व्यवसाय जगतात त्यांचे योगदान कमी झाले नाही. त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, ज्यात पूर्व लंडन विद्यापीठाकडून व्यवसाय नेतृत्वाबद्दल मानद डॉक्टरेट आणि लंडनमधील ‘पॉवरब्रँड्स हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स’मध्ये ‘बिझनेस आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांनी नंतरच्या काळात ‘सहारा इव्हॉल्‍स’ सारख्या उपक्रमांद्वारे इलेक्ट्रिक वाहननिर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले.

Exit mobile version