मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सूत्र हलवत मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांना मणिपूर इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. तर, पुढे विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले.
तणावग्रस्त भागातून सुखरूप परतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायचे आहेत. मणिपूरमधील परिस्थिती खूपच वाईट होती, इंटरनेट बंद होते आणि गोळीबार होत होता,” अशा भावना मणिपूरमध्ये अडकलेला विद्यार्थी रोहित याने मुंबईत आगमन होताच व्यक्त केल्या आहेत.
#WATCH | Mumbai: "We want to thank CM Eknath Shinde. The situation in Manipur was pretty bad, the internet was shut and there were firing," says student Rohit who was stuck in Manipur pic.twitter.com/m8oOrO2ItM
— ANI (@ANI) May 8, 2023
लोक घरांची जाळपोळ करत होते. स्फोट होत होते. गोळीबार होताना पाहिला एकूणच भयंकर परिस्थती असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. अशावेळी राज्य सरकारने मणिपूरमधून सुखरूप बाहेर काढल्याबद्दल या विद्यार्थ्यांनी शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या परिस्थितीत अडकले होते.
हे ही वाचा:
अनिल परब प्रकरणाची आजपासून सुनावणी
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
मेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार
सागरी जगभ्रमणासाठी आता मोहिमेवर निघणार नौदलाची महिला अधिकारी
मणिपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला विरोध करण्यासाठी राज्यामध्ये कुकी आदिवासी गटाने काढलेल्या निषेध मोर्चामुळे अशांतता उफाळून आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या आदेशात राज्य सरकारला मैतेई समुदायाचा अनुसूचित जमाती (एसटी) यादीत समावेश करण्याच्या मागणीबाबत केंद्राकडे शिफारस पाठविण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून परिस्थिती नियंत्रणासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.