ठाकरे सरकारकडून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला गेल्याच आठवड्यात हिरवा कंदील मिळाला. कोरोना नियमांचे पालन करून ८ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरपंचांवर ढकलण्यात आला. परंतु आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र शाळा सुरू करण्याबद्दल काहीतरी वेगळेच विधान करत आहेत. महाविद्यालये सुरू झाल्यानंतरच आता शाळा सुरू करता येतील, असे टोपे यांचे म्हणणे आहे.
राजेश टोपे नुकतेच म्हणाले की, ‘महाविद्यालये सुरू झाल्यानंतरच शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाऊ शकतो. अधिक बोलताना ते म्हणाले की, सध्या उपलब्ध कोरोना लस ही लहान मुलांना अजून देण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शाळा सुरू करता येणार नाही.’
गेली दीड वर्षे शाळा बंद असल्यामुळे गाव-खेड्यातील मुलांचे अतिशय नुकसान झालेले आहे. मुंबईसारख्या शहरामध्येही स्मार्टफोन घेऊ शकत नाही असाही वर्ग आहे. त्यामुळे शाळेत जाऊन शिक्षणाशिवाय अनेकांना आता पर्याय उरला नाही. दुसरीकडे मात्र पालकांकडून अतिशय वेगळे चित्र पाहायला मिळालेले आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून तब्बल ८६ टक्के पालकांनी शाळा सुरू करा, असे म्हटले आहे. तर ठाकरे सरकार मात्र शाळा सुरू करण्याबाबत अजूनही उदासीन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही राजेश टोपे यावेळी सांगायला विसरले नाहीत.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार मेट्रो कारशेड कुठे बांधणार?
नारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती
विजयी भव! पंतप्रधान साधणार भारताच्या ऑलिम्पिक चमूशी संवाद
परमबीर यांनी मागितला ईडीकडे अवधी
ठाकरे सरकार शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल अजूनही कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाहीत. सरपंचांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार स्वतःची सुटका करून घेत आहे हेच खरे. अधिक बोलताना ते म्हणाले, सध्या १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरण करीत आहोत आणि म्हणूनच जेथे लसीकरण चालू आहे तेथे महाविद्यालये सुरू करण्यात कोणतीही हानी वाटत नाही. परंतु आम्ही अल्पवयीन मुलांसाठी अजून लसीकरण सुरु झाले नाही. म्हणूनच प्रथम महाविद्यालये सुरू केली पाहिजेत आणि नंतर शाळा सुरू करता येतील.