महाराष्ट्रातील पहिले ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी कोणत्याही मुल्यमापनाविना पुढच्या इयत्तेत जाणार आहेत. महाराष्ट्रातील बिघडत चाललेल्या कोरोना परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश पोस्ट करत याविषयीची घोषणा केली.
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशातली सर्वाधिक कोरोना रूग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लाॅकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. या सगळ्या पार्शवभूमीवर महाराष्ट्रातील शालेय परीक्षा या कशाप्रकारे घ्यायच्या हा प्रश्न प्रशासनासमोर आ वासून उभा होता. त्यात गेले वर्षभर कोरोनामुळे महाराष्ट्रातल्या शाळा या ऑनलाईन सुरु होत्या. त्यामुळे म्हणावं तेवढा अभ्यासक्रमही शिकवून झाला नव्हता. अशा सगळ्या परिस्थितीतचा विचार करता महाराष्ट्र शासनाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतेही मुल्यमापन न करता सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
सचिन वाझे ७ एप्रिलपर्यंत एनआयएच्याच ताब्यात
मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.या परिस्थितीत गेल्या वर्षभरात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होऊ शकले नाहीत. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला पण त्यातही अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही. अशातच राज्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आपण पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यांतर्गत या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन होणे गरजेचे आहे. पण आपण असेकोणतेही मूल्यमापन न करता विद्यार्थ्यांची वर्गोन्नती करायचा निर्णय घेतला आहे.