विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसमध्ये सीटबेल्टची सुविधा असणाऱ्या बसेस फारच कमी असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील ४७ टक्के प्रतिवादींनी त्यांच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसमध्ये सीटबेल्ट नसल्याचे सांगितले. मुंबईतील ४५ टक्के आणि पुण्यातील ३४ टक्के प्रतिवादींनीही हेच कारण दिले. ‘सेव्ह लाईफ’ आणि ‘मर्सिडीज बेन्झ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडिया’ यांनी केलेल्या ‘नॅशनल स्टडी ऑन सेफ कम्युट टू स्कूल’ या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
सर्वेक्षणादरम्यान शाळांनी रस्ता वाहतूक सुरक्षे संबंधित काही कार्यशाळांचे आयोजन केले आहे का, अशी विचारणा केली असता ७३ टक्के प्रतिवादींनी याबद्दल काहीही कल्पना नसल्याचे किंवा आयोजित न केल्याचे सांगितले. अहवालानुसार शाळेत येता- जाता ३० टक्के विद्यार्थ्यांनी अपघात प्रत्यक्ष पाहिले आहेत, तर ६ टक्के विद्यार्थी स्वतः शाळेत येता- जाता अपघातात सापडले आहेत.
हे ही वाचा:
६८ वर्षांनी एअर इंडिया टाटांकडे
चीनची पुन्हा आगळीक; तवांग क्षेत्रात केली घुसखोरी
महाराष्ट्रात १०५० कोटींचा भ्रष्टाचार
आयकर विभागाची कारवाई पवारांना बोचली! भाजपावर आगपाखड
वाहन चालकाबद्दल विचारणा केली असता खासगी वाहनातील चालकाबद्दल देशभरातील २३ टक्के पालकांनी आणि २६ टक्के विद्यार्थ्यांनी चालक वाहन वेगाने चालवत असल्याचे सांगितले. तसेच मुंबईतील ३२ टक्के पालकांनी आणि ५२ टक्के विद्यार्थ्यांनी, तर पुण्यातील २३ टक्के पालकांनी आणि १४ टक्के विद्यार्थ्यांनीही वाहन चालक वाहन वेगाने चालवत असल्याचे सांगितले. मुंबईतील ४० टक्के प्रतिवादींनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शाळेत नेणारे बस चालकही वेगाने बस चालवतात.
शाळेच्या परिसरात स्वतंत्र सायकल ट्रॅक नसल्याचे सुमारे ५० टक्के प्रतिवादींनी सांगितले. तसेच ३० टक्के प्रतिवादींनी फुटपाथ नसल्याचेही सांगितले.