वाशिमच्या एका शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून एक ५० फूट लांबीचे पत्र लिहिले आहे. ‘किशोर’ या मासिकाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळेने हा अनोखा उपक्रम हाती घेतला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे पत्रलेखनाचे काम करण्यात आले.
‘किशोर’ मासिकाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात शाळेतील विद्यार्थ्यांनी ५० फूट लांबीचे पत्र तयार करून लिहिले आहे. मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तकाबाहेरीलही ज्ञान मिळावे, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या मनावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत, या उद्देशाने गेली पन्नास वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केले जाते.
हे ही वाचा:
अखेर आर्यन खानची दिवाळी मन्नतवर!
‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’
पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’
हे पत्र लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांनी ५० फूट अखंड पांढरा कागद वापरला आहे. १९७१ ते २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे ‘किशोर’ मासिकाचे मुखपृष्ठ पत्रांवर लावलेले आहेत. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केली आहेत.
अनेक विद्यार्थी या पत्रलेखन उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. या अनोख्या कल्पनेचा विद्यार्थ्यांनी भरभरुन आनंद घेतला. मुलांमध्ये ‘किशोर’ हे मासिक अत्यंत प्रसिद्ध असून ‘किशोर’चा ५० वा वाढदिवस साजरा होत आहे, म्हणून ही वेगळी कल्पना डोक्यात आल्याचे शाळेचे शिक्षक गोपाल खाडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची ही वेगळी पद्धत पाहून सध्या या पत्राची चर्चा आहे.