महाराष्ट्रात आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तो जिल्हा म्हणजे औरंगाबाद. याआधीच महाराष्ट्राच्या बीड, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यात आता औरंगाबादची भर पडली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली असून महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चालली आहे. महाराष्ट्र सध्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या या परिस्थितीबद्दल केंद्र सरकारकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याची हे परिस्थिती बघता राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. शनिवारी औरंगाबादमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत हा लॉकडाऊन लावला जाणार आहे. गेले काही दिवस औरंगाबादमधली कोरोना परिस्थिती बिघडली आहे. दिवसागणिक जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण मिळत आहेत. हॉस्पिटल्समध्ये बेड्सही उपलब्ध नाहीयेत. औरंगाबाद हा देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या दहा जिल्ह्यांपैकी एक आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी
पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी
बांग्लादेशच्या स्वातंत्र्याची पहिली मागणी जनसंघाचीच
दरम्यान महाराष्ट्रात २८ मार्च पासून रात्रीची जमावबंदी लावण्यात आली आहे. शनिवारी मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या जमावबंदीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत कुठल्या गोष्टींना कुठल्या वेळेत परवानगी आहे आणि कशावर बंदी आहे हे जाहीर करण्यात आले आहे.
काय आहेत निर्बंध?
महाराष्ट्र शासनाच्या जमावबंदीच्या नियमावलीनुसार खालील प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत ५ पेक्षा जास्ती लोकांना एकत्रित फिरण्यास बंदी असणार आहे. या गोष्टीचे उल्लंघन केल्यावर माणशी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासोबतच रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत उद्याने, समुद्र किनारे, रेस्टोरंट्स, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स अशी सगळी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेस्टोरंट्सना रात्री ८ नंतर डिलिव्हरीची सेवा देण्यास परवानगी आहे. विना मास्क फिरणाऱ्या लोकांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे तर उघड्यावर थुंकणाऱ्यांकडून १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभांना ५० माणसांना हजार राहण्यास परवानगी असेल. तर अंत्यविधीसाठी २० जण उपस्थित राहू शकतात.