इशांतच्या शंभरीची कथा

इशांतच्या शंभरीची कथा

एकेकाळी ह्या बॉलरने सामना जिंकण्यासाठी मुख्य विकेट घेतल्या तर धोनीची ‘फाटकी नोट’ चालली अशाप्रकारे खिल्ली उडवली जायची. परंतु, हाच इशांत शर्मा आज भारतीय संघात सर्वात अनुभवी आणि यशस्वी बॉलर म्हणून प्रसिद्ध आहे.

अलीकडे झालेला भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना हा अनेक बाबींमुळे ऐतिहासिक ठरला. सर्वात मुख्य म्हणजे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन झाल्यावर हा पहिलाच सामना या ठिकाणी खेळला गेला. हा सामना केवळ दीड दिवसातच संपला. १९३५ नंतर सर्वात कमी चेंडू खेळले गेलेला हा पहिलाच सामना! या सामन्यात केवळ ८४२ चेंडू टाकले गेले. त्यामुळेही, हा सामना विशेष आहे! याशिवायही अन्य विक्रम किंवा विशेष बाबी या सामन्यात झाल्या असतील पण आजच्या लेखनाचा विषय आहे इशांत शर्मा! त्यामुळे त्याच्यासाठी शेवटचा झालेला सामना हा विशेष कसा होतो ते आता पाहू.

३२ वर्षीय इशांतने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची सुरुवात २००७ मध्ये केली. आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक चढउतार पाहिले. त्याच्यावर अनेकदा टीका झाल्या, त्याला अनेकदा ट्रोल करण्यात आले. हा सर्व खडतर प्रवास पार करत आज इशांतने आपले १०० कसोटी सामने पूर्ण केले! कपिल देव यांच्यानंतर १०० टेस्ट खेळणारा इशांत हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. विजय दहिया यांनी केलेल्या भविष्यवाणी नुसार १०० कसोटी सामने खेळणारा इशांत हा अंतिम गोलंदाज असेल. कारण, अलीकडील गोलंदाज हे स्वतःला मर्यादित षटकांच्या सामान्यांसाठी तयार ठेवतात. ते मर्यादित षटकांचे सामने पसंद करतात. त्यामुळे, कसोटी सामन्यांत यापुढे इतके सामने खेळणारा वेगवान गोलंदाज कोणी होईल असे दहियांसोबत मलाही वाटत नाही.

इशांत शर्मा सुरुवातीला मला स्वतःलाही आवडला नाही. कदाचित त्याच्या विचित्र लूकमुळे असेल. उंच, बारीक, केस विचित्रपद्धतीने वाढवलेले लांबच्या लांब सुट्टे, गळ्यातुन बाहेर आलेला मोठा कंठ! पण दिसतं तसं नसतं, बाह्य सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता हवी ह्या गोष्टी मग कळायला लागल्या. क्रिकेट प्लेयरलाच काय तर कोणत्याही व्यक्तिमत्वाला त्याच्या क्षेत्रात लूक पेक्षा उत्तम परफॉर्मन्स जास्त गरजेचा असतो. हे सर्व कळायचं ते वय नव्हतं. आता त्याच्या १०० कसोटी झाल्यावर त्याच्याविषयी मी हे जे लिहीत आहे ते ७-८ वर्षांपूर्वी स्वप्नातही वाटलं नाही. इशांतचा डेब्यु झाला तेव्हा मी केवळ ८ वर्षांचा होतो. त्याचा डेब्यु काही माझ्या लक्षात नाही. पण त्याच साली झालेला सर्वात पहिला इंटरनॅशनल टी ट्वेंटी वर्ल्ड कप मात्र विस्तारितपणे लक्षात आहे. अलीकडेच निवृत्त झालेला युसूफ पठाण हा त्या वर्ल्ड कपमध्ये नवीन चेहरा, गंभीर-सेहवागची फायरब्रॅंड ओपनिंग, युवराज सिंगचे सहा सिक्स आणि ओव्हरऑल अफलातून फॉर्म, धोनीची चमत्कारिक परंतु यशस्वी कप्तानी, इंडिया पाकिस्तान मॅच टाय झाल्यावर झालेला बॉल आउट, श्रीसंत व जोगिंदर शर्मा या काही नावांमुळे तो वर्ल्ड कप खरोखरच अविस्मरणीय झाला.

असो, तर २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आपला डेब्यु करणारा ‘लंबू’…हो लंबू म्हणजेच इशांत शर्मा, लंबू हे त्याचे टोपणनाव…२००८ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध रिकी पॉंटिंग विरुद्धचा त्याचा स्पेशल स्पेल हा आजही लक्षात राहिलेला आहे. दोन्ही इनिंगमध्ये १९ वर्षीय इशांतने रिकी पॉंटिंग सारख्या मातब्बर फलंदाजाला तंबूत परतवले होते. त्याचवेळी, पॉंटिंगने एका खासगी वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की इशांत हा नक्कीच सर्वांपेक्षा वेगळा बॉलर आहे.

इशांत शर्मा हा मूळचा दिल्लीचा. लहानपणापासून अभ्यासाची आवड कमी, घरून ट्युशनला म्हणून निघालेला इशांत घराबाहेर पडल्यावर थेट क्रिकेटच्या मैदानात जात असे. क्रिकेटच्या वेडापायी इशांत केवळ दहावीपर्यंत शिकला. पुढे त्याने पूर्ण वेळ क्रिकेटसाठी दिला व दहावीनंतर तीन वर्षातच इशांतच्या मेहनतीचे फळ मिळाले. १९ वर्षीय इशांत शर्माची भारतीय संघात निवड झाली आणि प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या मुलाचे जे स्वप्न असते ते स्वप्न इशांतचे लगेचच पूर्ण झाले.

इशांत शर्मा मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या तुलनेत कसोटी सामन्यात अधिक चमकला. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात तसे इशांतच्याही आले. कधी फॉर्म जायचा कधी यायचा पण अलीकडे इशांतने दाखवलेले सातत्य हे नवीन खेळाडूंसाठी अतिशय उपयुक्त आहे. ६ फूट ४ इंच उंची असल्याने इशांतचे नो बॉल खूप पडले आहेत. अनेकदा विकेट घेतलेला चेंडू नो बॉल ठरून बाद व्हायचा व इशांत क्रिकेट प्रेमींच्या हिटलिस्टवर यायचा परंतु यातही इशांतने सुधारणा केली. प्रत्येक मॅचमध्ये इशांत आपल्या अनुभवातून काहीतरी शिकताना दिसतो व आपली बॉलिंग उत्तमोत्तम करतो. याचे, प्रात्येक्षिक आपल्याला त्याच्या सुधारलेल्या कामगिरीतून दिसते.

इशांत शर्माने स्वतःच्यात केलेली सुधारणा, मग ती खेळात असो वा व्यक्तिमत्वात; खरंच प्रशंसनीय आहे! व्यक्तिमत्त्व विकास कसा करायचा याचे इशांत हा उत्तम उदाहरण आहे. तो यापुढेही आपल्या कर्तृत्वाने भारतमातेचे नाव रोशन करीत राहील अशी आशा आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

– अथर्व अनंत हर्डीकर

Exit mobile version