राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील पिंडवाडा हा तसा आदिवासी तालुका. मात्र तेथील सुमारे एक हजार कारागीर सध्या वेळेशी स्पर्धा करत अयोध्येमध्ये उभे राहात असलेल्या राम मंदिराचे खांब, कमान, छतासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडांवर कोरीव काम करत आहेत. हे मंदिर जानेवारी २०२४ मध्ये भाविकांसाठी खुले होणार असून मंदिराच्या पहिल्या टप्पा या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
दगडी कोरीव काम करणारे ४४ वर्षीय रूपारम यांनी १८ महिन्यांपूर्वी मंदिराचे काम सुरू झाल्यापासून एकही साप्ताहिक सुट्टी घेतलेली नाही. ‘आमचे काम ना कडक उन्हाळ्यात थांबले ना पावसात. लोकांना आपण पाठवलेली एक तरी वीट मंदिराच्या उभारणीसाठी उपयोगी पडू दे, अशी प्रार्थना करत असतात. मात्र येथे आम्ही या मंदिराचे बहुतेक काम पूर्ण करत आहोत,’ असे ते कौतुकाने सांगतात. राम मंदिर रामलल्लाच्या दर्शनासाठी खुले झाल्यानंतर त्यांना एकदा राम मंदिराला भेट द्यायची आहे असे त्यांनी सांगितले.
पिंडवाडा तालुक्यात आजच्या घडीला सुमारे २० हजार दगडी कोरीव काम करणारे कारागीर आहेत. ते विशेषत: मंदिर उभारणीसाठीच ओळखले जातात. येथे दगड कापणारे आणि कोरीव काम होणारे सुमारे २०० युनिट्स आहेत, त्यातील ६० तर केवळ मंदिरे उभारण्याचेच काम करतात. अन्य कारखान्यांमध्ये सरकारी इमारती, कार्यालये, वस्तूसंग्रहालये, मोठ्या खासगी कंपन्यांच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे काम केले जाते.
न्यू जर्सी, नवी दिल्ली आणि डिसेंबरपर्यंत पूर्ण होणारे अबूधाबी येथील स्वामीनारायण मंदिर, बँकॉक आणि मेलबर्न येथील जैन मंदिर आणि काशी विश्वनाथ आणि महाकालेश्वर मंदिराच्या कॉरिडोरचे काम याच पिंडवाडा येथील कारागिरांच्या कौशल्यपूर्ण हातांनी साकारले आहे.
हे ही वाचा:
उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाःकार; रस्ते, पूल गेले वाहून
बेहिशोबी मालमत्ता जमवणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी अटकेत
धक्कादायक! गोरेगावमध्ये रिक्षात महिलेवर अतिप्रसंग
‘वंदे भारत ट्रेन’ आता केसरी रंगात दिसणार!
‘पिंडवाडा येथील कारागिरांकडे अलौकिक कौशल्य आहे. त्यांनी आतापर्यंत देशभरातील आणि परदेशातीलही अनेक मंदिरांचे बांधकाम केले आहे. त्यामुळेच पिंडवाडामधील तीन कारखान्यांना दगड कापण्याचे आणि कोरण्याचे काम देण्यात आले आहे,’ अशी माहिती अयोध्या मंदिराचे वास्तूविशारद आशिष सोमपुरा यांनी दिली. राम मंदिरात मोठ्या कॉरिडॉरेचेही काम करायचे आहे. त्यासाठी तब्बल आठ लाख क्युबिक फूट कोरीव काम केलेले दगड लागणार आहेत. हे कामही पिंडवाडामधील कारखाने मिळवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राम मंदिराचे काम सध्या तीन कंत्रायदार करत आहेत. त्यातील एक आहेत परेशभाई सोमपुरा. ‘सुमारे ६० युनिट्स देशभरातील आणि देशाबाहेरील उभ्या राहणाऱ्या सुमारे १०० मंदिरांच्या उभारणीचे काम करत आहेत. कोणतेही विशेषत: नागारा शैलीतील मंदिर उभारायचे असल्यास पहिली पसंती पिंडवाडालाच दिली जाते,’ असेही त्यांनी सांगितले.
पिंडवाडातील तिन्ही कंत्राटदारांनी मिळून ४.५ लाख क्युबिक फुटांचे दगडीकाम केले आहे. परेश यांच्या कारखान्याने त्यांच्याकडे आलेल्या १.६ लाख क्युबिक फूट कामांपैकी दोन तृतीयांश काम पूर्ण केले आहे. कोरीव काम केलेले खांब, कमानी आणि अन्य बाबी ट्रक आणि ट्रेलरमधून सुमारे एक हजार १०० किमी अंतरावर असलेल्या अयोध्येत पाठवले जातील. मंदिर डिसेंबरमध्ये खुले होणार असले तरी खांब आणि छतांची उभारणी करून शेवटचा मुलामा देण्यासाठी त्यांना हे काम त्याआधी पूर्ण करून द्यायचे आहे. परेश यांनी काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, त्यांच्या कारखान्यात आणखी दोन युनिट वाढवले आहेत आणि वाढीव बिदागी देऊन आणखी कारागीर कामाला लावले आहेत. ‘माझे दोन युनिट्स पुरेसे होणार नाहीत, असे वाटल्याने मी ते वाढवले आहेत. दोन वर्षांपूर्वी ४०० ते ५०० रुपये असणारी दैनंदिन मजुरीही ८०० ते १२०० रुपयांपर्यंत पोहचली आहे,’ असे त्यांनी सांगितले.
भरतपूरमधील गुलाबी वाळूचा खडकही वरदान
भरतपूरमधील गुलाबी वाळूचा खडकासाठीही राम मंदिर वरदान ठरले आहे. केंद्राच्या आदेशानुसार, राजस्थान सरकारने मंदिराच्या बांधकामासाठी वाळूचा खडक उपलब्ध व्हावा यासाठी बंद परेथा वन्यजीव अभयारण्यातील बन्सी पहारपूर ब्लॉकला अधिसूचित क्षेत्रातून वगळले होते. त्यामुळे ३९ खाणींना त्यांच्या किमतीच्या २० पट अधिक किंमत मिळाली. खाणकामाचा अनुभव नसलेल्या लोकांनीही मंदिराच्या बांधकामात योगदान देण्यासाठी लिलावात भाग घेतला. भरतपूरपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या बन्सी पहारपूर येथून राम मंदिरासाठी गुलाबी वाळूचा खडक खणला जातो. हा खडक ५५ किमी अंतरावरील बायणा येथे कापला जातो. त्यानंतर, कापलेला दगड ६०० किमीपेक्षा अधिक प्रवास करून पिंडवाडापर्यंत पोहोचवला जातो.