नुकताच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या २०१९ साली घेतलेल्या जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले. केंद्र सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय योग्य असल्याचं सांगत कलम ३७० रद्द ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. विविध स्तरावरून यानंतर प्रतिक्रिया येत असताना यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी कलम ३७० रद्द केल्याने गेल्या चार वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये काय सकारात्मक चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे.
शिवाय जम्मू- काश्मीरमधील तरुणांच्या जीवनात कसे अमुलाग्र बदल झाले आहेत हे ही त्यांनी सांगितले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना विकास हवा आहे आणि त्यांना त्यांच्या शक्ती आणि कौशल्याच्या जोरावर भारताच्या विकासात योगदान द्यायचे आहे. त्यांना त्यांच्या मुलांसाठी चांगल्या दर्जाचे जीवन हवे आहे, हिंसा आणि अनिश्चिततेपासून मुक्त जीवन हवे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लेखात अफशा आशिक या तरुणीचा देखील उल्लेख केला आहे. कधीकाळी ही तरुणी श्रीनगरमधील दगडफेकीत सहभागी होती. परंतु, कलम ३७० रद्द झाल्यानंतर तिला तिच्यातील फुटबॉलचे कौशल्य उमगले. तिला ते जगता आले. तिला त्यानुसार प्रशिक्षण मिळालं आणि आज ती देशातील नामवंत फुटबॉलपटू आहे.
हे ही वाचा:
शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!
भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!
कमाल झाली ! बसतिकिटाची मशीन चोरणाऱ्या चोरानेच कंटक्टरला विचारले तिकीट
केरळच्या राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; शारीरिक इजा करण्याचा कट रचल्याचा आरोप
याबाबत नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, “क्रिडा क्षेत्रातील तरुणांची क्षमता लक्षात घेऊन आम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध उपक्रम राबवले. विविध खेळांच्या माध्यमातून तेथील तरुणांच्या आकांक्षा आणि भविष्यात झालेले बदल आम्ही पाहिले आहेत. या दरम्यान विविध खेळांच्या जागांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रशिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. स्थानिक पातळीवर फुटबॉल क्लबची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या सर्वांचा परिणाम चांगला होतो आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“मला प्रतिभाशाली फुटबॉल खेळाडू अफशा आशिक हिचं नाव आठवतंय. डिसेंबर २०१४ मध्ये ती दगडफेक करणाऱ्या समुहात होती. परंतु, योग्य प्रोत्साहन मिळाल्याने तिने फुटबॉल खेळासाठी प्रयत्न केले. तिला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं. या खेळात तिने उत्कृष्ट कामगिरी केली. फिट इंडिया डायलॉग्स या कार्यक्रमात तिच्याबरोबर माझी भेट झाली होती. मला आनंद आहे की, आता तरुणांनी किकबॉक्सिंग, कराटे आणि इतर अनेक खेळात आपली प्रतिभा दाखवायला सुरुवात केली आहे.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लेखातून काश्मीरमधील बदलती परिस्थिती यावर भाष्य केलं आहे. यातून त्यांनी तरुणांच्या आयुष्यात झालेल्या बदलाबाबत त्यांनी भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाने ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ या भावनेला बळ दिले असल्याचेही ते म्हणाले.