आशियाई गेम्ससाठी कुस्तीगीरांची निवड चाचणी अजूनही रखडलेली

२३ जुलैपर्यंत चाचणीचे निकाल पाठविण्याचे केले होते आवाहन

आशियाई गेम्ससाठी कुस्तीगीरांची निवड चाचणी अजूनही रखडलेली

देशातील क्रीडा क्षेत्राशी संबंधित दैनंदिन बाबींसाठी असणारे क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि त्यांची दोन सदस्यीय समिती अशी सर्व यंत्रणा असतानाही अद्याप आशियाई गेम्ससाठी कुस्तीगीरांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली नाही. हँगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई गेम्ससाठी खेळाडूंची नावे पाठवण्याची अंतिम तारीख २३ जुलै ही आहे. त्यामुळे सध्या कुस्तीगीरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

 

 

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्तीगीरांची नावे पाठवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडे केली आहे. जेणेकरून, कुस्तीगीरांची निवड चाचणी ५ ते १५ ऑगस्टपर्यंत घेता येईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यावर अद्याप लिखित प्रतिसाद मिळालेला नाही.

 

हे ही वाचा:

जाणते, अजाणत्याच्या वाटेवर…

शरद पवार म्हणाले की, भाजपाशी चर्चा केली होती; पण विचारधारेमुळे पुढे पाऊल टाकले नाही

पंचायत निवडणूक: तृणमूल काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांची हत्या

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे दोन्ही क्रिकेट संघ खेळणार

कुवेतमध्ये मुख्यालय असणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक असोसिएशनने कुस्तीगीरांची नावे २३ जुलैपर्यंत पाठवण्यासंदर्भात केवळ तोंडी आश्वासन दिले होते. भारतीय ऑलिम्पिक प्राधिकरण आणि संबंधित समितीने अद्याप निवड चाचणीसंदर्भात काहीही स्पष्ट केलेले नाही.

 

आयओएचे संयुक्त सचिव आणि सीईओ कल्याण चौबे यांनी समितीचे सदस्य भुपेंदरसिंग बाजवा आणि दोन कुस्तीतज्ज्ञ आणि राष्ट्रीय स्तरावरील दोन प्रशिक्षकांसोबत येथील मुख्यालयात गुरुवारी बैठक घेतली. यावेळी निवडचाचणी आणि आशियाई गेम्समध्ये खेळू शकणाऱ्या संभाव्य खेळाडूंच्या नावांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीतून काहीही तोडगा निघू शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व गोंधळी कारभारामुळे सर्व कुस्तीपटूंच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आशियाई गेम्ससाठी देशाचे प्रतिनिधीत्व करता यावे, यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.

 

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा आणि चौबे हेदेखील आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष राजा रणधीरसिंग यांची भेट घेण्यासाठी तातडीने बँकॉकला रवाना झाले. मात्र या बैठकीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

Exit mobile version