छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी राज्यासह देशभरातून केली जात आहे. प्रशासनाने कबर काढावी अन्यथा स्वतः काढून फेकू, असा इशारा राज्यातील विविध हिंदू संघटनांकडून देण्यात आला आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या वाद सुरु असताना अक्कलकोटमध्ये औरंगजेबाचे सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्याचे समोर आले आहे. सोशल मिडीयावर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या आक्षेपार्फ पोस्ट प्रसारित करून सामाजिक व आर्थिक तेढ निर्माण करून अराजकता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा २२ जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर व दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, गुन्हे दाखल झालेल्या २२ जणांपैकी ९ जण अल्पवयीन आहेत. औरंगजेबाच्या स्टेट्स प्रकरणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत आवाज उठवत कारवाईची मागणी केली होती. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये औरंगजेबाचे स्टेट्स ठेवण्याचे प्रमाण वाढत असल्याची खंत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत व्यक्त केली होती. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणी अक्कलकोट उत्तर व अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यांतर्गत २२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये ९ अल्पवयीन आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
हे ही वाचा :
औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल!
देशात १९,८२६ किलोमीटर महामार्गाचे बांधकाम पूर्ण
होळी मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दगडफेक
दरम्यान, राज्यातून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सर्व स्तरावरून करण्यात येत आहे. तर काही जणांकडून अशा मागणीला विरोध देखील केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून औरंगजेब परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरात पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. कबरीला भेट देण्यासाठी येणाऱ्यांची चौकशी आणि तपासणी केली जात आहे.