महाराष्ट्रामध्ये एसटी ही जीवनवाहिनी आहे. परंतु एसटीची सद्यस्थिती ही अतिशय बिकट आहे. सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असलेल्या लालपरीची अवस्था ही खूपच वाईट झालेली आहे. त्यात दोन टप्प्यांत लॉकडाऊनमुळे कर्जाचा बोजा ९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. सध्या महामंडळ फक्त १०,००० बस वापरत आहे. या सर्व बसेसवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पहिल्या टप्प्यात अँटी मायक्रोबियल कोटिंगची फवारणी करण्यात येणार आहे.
परंतु याबाबतही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. एसटी महामंडळ आधीच आर्थिक डबघाईस आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. अनेक प्रकल्पांना गती देणे शक्य झालेले नाही. अशा परिस्थितीत या कोटिंगच्या अट्टहासामुळे आणखी खर्चात भर पडणार आहे. मुख्य म्हणजे या कोटिंगची वैधता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अजूनही लॅबची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच महामंडळाची सद्यस्थितीमध्ये अनेक देणीही थकलेली आहे.
प्रत्येक बससाठी कोटिंगची किंमत सुमारे ९५०० रुपये आहे. एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांच्या मते, कंत्राटदारांना त्यांच्या कोटिंगच्या टिकाऊपणाबद्दल प्रमाणपत्र हॅफकीन संस्थेकडून घ्यावे लागेल, त्याशिवाय, महामंडळ बसच्या पृष्ठभागावरून स्वॅब चाचण्या करून एजन्सीद्वारे कोटिंगचा दर्चा तपासावा लागेल. विषाणू, बॅक्टेरिया आणि बुरशीसारख्या विविध सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी पृष्ठभागावर अँटी-मायक्रोबियल कोटिंग ही रासायनिक प्रक्रिया करण्याचे ठरवले आहे.
हे ही वाचा:
मुंबईतील मैदानांवर पुन्हा होणार क्रिकेटचा जल्लोष
आर्यनबाबत शाहरुखने केलेले ते वक्तव्य खरे ठरतेय?
‘कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्स प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही’
देगलूरमध्ये होणार पंढरपूरची पुनरावृत्ती? सुभाष साबणे यांना भाजपाची उमेदवारी
एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, काही कार्यालये आणि विमान कंपन्या सहसा या कोटिंगचा वापर करतात. ते म्हणाले की साथीच्या आजारामुळे, संसर्ग होण्याच्या भीतीमुळे प्रवासी सार्वजनिक वाहतुकीवर प्रवास करण्यास नाखूष आहेत. या कोटींगमुळे प्रवासी बिनधास्तपणे प्रवास करू शकणार आहेत.
निविदा प्रक्रियेद्वारे शॉर्टलिस्ट केलेल्या दोन एजन्सींना १० हजार बसेससाठी अँटी मायक्रोबियल कोटिंगच्या कामाची ऑर्डर आधीच देण्यात आली आहे. लवकरच काम सुरू आता होणार आहे. कोटिंगमुळे व्हायरसचा संसर्ग रोखण्यास मदत होईल, सार्वजनिक वाहतूक बसमध्ये संपूर्ण स्वच्छता राखण्यास मदत होईल असे महामंडळाचे म्हणणे आहे.