राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धा
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर हौशी खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ५७ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर येथील पालखी मैदानावर सुरू आहे. पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. ठाणे व सांगली वि. पुणे तर महिलांमध्ये पुणे वि. उस्मानाबाद व रत्नागिरी वि. ठाणे उपांत्य फेरीत भिडणार आहेत. ठाणे आणि पुण्याचे दोन्ही संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडकले आहेत.
वेळापूरच्या पालखी मैदानावर महिला गटात उस्मानाबादने सातारावर १३-८ असा डावाने दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या वैभवी गायकवाडने आपल्या धारदार आक्रमणात ५ गडी टिपले. आश्विनी शिंदे ( ४.००, १.३० मि. संरक्षण), नम्रता गाडे (२.३० मि. संरक्षण) व किरण शिंदे (२.०० मि. संरक्षण) यांनी उत्कृष्ट खेळी केली. साताराच्या मयुरी जाधवने एक मिनिटे पळतीचा खेळ केला तर संचिता बोडरे हीने दोन बळी टिपले.
दुसऱ्या सामन्यात पुण्याने सोलापूरला १०-७ असे डावाने हरविले. पुण्याच्या प्रियंका इंगळेने (३.२० मि. संरक्षण व ४ गुण) अष्टपैलू खेळी केली. प्रिया भोर हीने नाबाद तीन मि. संरक्षण तर कोमल दारवाटकर हीने ३.१० मि. पळती केली. सोलापूरच्या प्रीती काळे (१.४० मि. संरक्षण) व संध्या सुरवसे (१.२०, १.४० मि. संरक्षण) यांचे प्रयत्न अपुरे पडले व त्यांना मोठ्या परभवाला सामोरे जावे लागले.
अन्य सामन्यात रेश्मा राठोडच्या (३.१० मि. संरक्षण व २गुण) अष्टपैलू खेळामुळे ठाणे जिल्ह्याने मुंबई उपनगरला १०-८ असे डावाने नमविले. रत्नागिरीने सांगलीस १५-१२ असे पराभूत केले. मध्यंतरची १०-६ ही आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. अष्टपैलू कामगिरी करणारी अपेक्षा सुतार (२.५०, १.५० मि. संरक्षण व ४ गुण) व आरती कांबळे ( १.३०, १.३० मि. संरक्षण व ४गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पुरुष गटात अरुण गुनकीच्या (१.३०, २.०० मि. संरक्षण व ४गुण) अष्टपैलू कामगिरीमुळे सांगलीने यजमान सोलापूरचा १८-१६ असा डावाने पराभव केला. सोलापूरकडून रामजी कश्यप, राहुल सावंत, अक्षय इंगळे, विनीत दिनकर यांनी प्रत्येकी ३ गडी टिपले. दुसऱ्या सामन्यात पुण्याने उस्मानाबादवर १७-११ अशी डावाने एकतर्फी मात केली. त्यांच्या मिलिंद करपे याने पाच गडी बाद केले. राहूल मंडलने २.२० मि. संरक्षण व अभिषेक खेंडेकर २.०० मिनिटे पळती केली.
हे ही वाचा:
जितेंद्र आव्हाड यांची तात्काळ हकालपट्टी करा
जिथे भगवा ध्वज उखडला; तिथेच हिंदूंनी उभारला १०८ फुटी ध्वजस्तंभ
चक्क राहुल गांधी म्हणत आहेत, हिंदूची सत्ता आणा!
महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस
अन्य सामन्यात ठाण्याने मुंबईवर १८-१७ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळविला. त्यांच्या लक्ष्मण गवस व शुभम उत्तेकर त्यांनी प्रत्येकी दोन मिनिटे पळती करीत तीन गडी टिपले. हर्षद हातणकरच्या (१.००, १.२० मि. संरक्षण व ३ गुण) अष्टपैलू खेळामुळे मुंबई उपनगरने अहमदनगरला १५-१३ असे ७.३० मिनिटे राखून हरविले. अहमदनगरच्या आकाश ढोले (१.४० मिनिटे व ३गुण) याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.