महाराष्ट्रातील तमाम एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना करण्यात आली असून त्याची नोंदणी २९ ऑगस्टला होत आहे. त्यासाठी आगाराचे अध्यक्ष व सचिव यांची बैठक वागळे इस्टेट, आयशर आयटी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ठाणे येथे होत आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
मात्र एकीकडे ही नोंदणी होत असताना अद्याप महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील कथित हल्लाप्रकरणी कारवाई झालेल्या ११८ एस.टी. कर्मचाऱ्यांचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याची चर्चा या बैठकीत होणार का, त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का, अशी विचारणा कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रीय क्रीडादिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन
कोळशाच्या खाणीमुळे चक्क १०० फूट गाडले गेले घर
उध्दव ठाकरे ‘ब्रिगेडी’यर झाले; फायदा कुणाला, तोटा कुणाला?
गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाच्या माध्यमातून तत्कालिन महाविकास आघाडीला आपल्या मागण्या कळविल्या होत्या पण त्यांची पूर्ती झाली नाही. त्यातच शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर केलेल्या आंदोलनात ११८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेच पण गेले १० महिने त्यांना पगार नाही.
अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित होईल का असा सवाल कर्मचारी विचारत आहेत. आणखी किती दिवस या कर्मचाऱ्यांना पगाराविना काढावे लागतील. पगार मिळाला नाही तर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याचा विचारही कर्मचारी करू शकतील, तेव्हा त्याची जबाबदारी कोण घेईल, असे प्रश्न निर्माण होत आहेत.
गेल्या वर्षी २६ एप्रिलला हे ११८ कर्मचारी जामीन मिळाल्यानंतर कोठडीतून बाहेर आले आहेत. पण त्यांना अद्याप सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही.