गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आलेला असताना एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संघटना आजपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करणार आहे.
एस टी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघाला नसल्याने एस टी कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी काल राज्यभरात तीव्र निदर्शन करण्यात आली. यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला. यानंतर आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटाका गणेशोत्सवात मुंबईहून गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना बसणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट ५००० रुपये मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदी उद्यापासून ब्रुनेई-सिंगापूर दौऱ्यावर !
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड
पश्चिम बंगाल: विशेष अधिवेशनात मांडणार विधेयक; बलात्काराच्या दोषींना १० दिवसांत फाशी
मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी
सध्या २५१ आगारांपैकी ३५ आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पूर्णतः सुरू आहेत. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. त्याचबरोबर, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णपणे बंद आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यातही मिरज, जत, पलूस हे आगार बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे.