गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, महामंडळाचे सरकारमध्ये विलनीकरण करावे यासाठी आंदोलनाने जोर पकडला आहे. खेडेगावात एसटीला प्रचंड महत्त्व असताना गेल्या काही दिवसांपासून या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. राज्यातील २५० पैकी १६० आगार सध्या बंद आहेत. आज आणखी काही आगारातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
महामंडळाचे सरकारमध्ये विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता आहे. एसटीचा प्रश्न आता न्यायालयात पोहचला असून शनिवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संप अजूनही सुरू आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील सरपंच परिषदेसह इतर संघटनांकडून पाठींबा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा:
‘आर्यन खानसाठी बैठका; पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही’
रुग्णालयांमधील आगींच्या घटनेत दीड वर्षात गेले ५१ बळी
एनसीबीने गोठवली १२ कोटींची मालमत्ता
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून एसटीलाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. आतापर्यंत एसटी महामंडळाचे ५५ कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. आर्थिक चक्र बिघडलेल्या महामंडळाला या संपाचा पुन्हा फटका बसला आहे. संपापूर्वी राज्यातील एसटी महामंडळाची प्रवासी संख्या २७ लाख होती तर आता प्रवासी संख्या २० लाखांहून कमी झाली आहे.