राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले असून एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. महेश लोले असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून महेश लोले हे एसटी कंडक्टर म्हणून कार्यरत होते. परळ एसटी डेपोजवळ महेश लोले हे मृत अवस्थेत आढळून आले होते. दादर पोलीस ठाण्यात महेश लोले यांच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला. एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करत चप्पल आणि दगडफेक केली. दरम्यान, महेश लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
महेश लोले हे चार दिवसांपूर्वीच मुंबईत आले होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. महेश लोले यांच्या सहकार्याने दिलेल्या माहितीनुसार ते काल आझाद मैदान किंवा आंदोलन स्थळी गेले नव्हते. तसेच महेश लोले यांच्या मृतदेहावर कोणत्याही पद्धतीच्या जखमा किंवा निशाण आढळून आलेले नाहीत. मात्र, महेश लोले यांना दारूचे व्यसन होते आणि त्यांनी नशामुक्त केंद्रात काही कालावधी घालवला असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
सोमय्या पिता पुत्रांना मुंबई पोलिसांचे समन्स
थप्पड प्रकरणामुळे स्मिथला १० वर्षे ऑस्कर सोहळ्यात उपस्थित राहता येणार नाही
पाच लाख दिव्यांपासून साकारली जाणार प्रभू रामचंद्रांची भव्य कलाकृती
महेश लोले यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून त्यांचे कुटुंबीय आज मुंबईत येणार आहे. त्यानंतर लोले यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन होण्याची शक्यता आहे. सध्यातरी त्यांच्या मृत्यूचे कोणतेही संशयास्पद कारण आढळून आलेलं नाही.