… म्हणून एसटी बसमधील दिवे सुरूच राहणार!

… म्हणून एसटी बसमधील दिवे सुरूच राहणार!

एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रात्रीही बसच्या आतील दिवे सुरूच ठेवण्यात येणार आहेत.

राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने महिलांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल उचलले आहे. एसटी बसमध्ये महिला रात्रीचा प्रवास करत असेल आणि महिलांनी विनंती केल्यास बसमधील दिवे आता सुरूच ठेवण्यात येणार आहेत. महिलांच्या विनंतीला एखाद्या वाहकाने विरोध केल्यास महिलांना संबंधित वाहकाची तक्रार थेट आगारप्रमुखांना करता येणार आहे.

रात्रीच्या वेळी चालकाच्या डोळ्यांना त्रास होतो म्हणून बस गाड्यांमधील दिवे चालकाकडून बंद केले जातात. या अंधारामुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्या अनेक महिलांना वाईट अनुभव आले आहेत. अनेकदा रातराणीने प्रवास करताना काही महिलांसोबत अनुचित प्रकार घडल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने महिलांसाठी हा निर्णय घेतला आहे. महिलांनी विनंती केल्यास रात्रीच्या वेळी बसमधील दिवे चालू ठेवणे अनिवार्य असणार आहे.

हे ही वाचा:

मी स्वतः भारतीय लस घेतली आहे, यूएनजीए अध्यक्षांनी जगाला सांगितले

एलएसीचं रक्षण करायला ‘वज्र’ तैनात

शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!

या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसटी महामंडळाने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून रात्रीच्या वेळी महिलांनी बसमधील दिवे सुरू ठेवण्यास विनंती केल्यास दिवे सुरू ठेवण्याच्या सूचना आगारप्रमुखांमार्फत वाहकांना देण्यात आल्या आहेत, असे एसटी महामंडाळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘मी एसटीने प्रवास करते कारण हा सुरक्षित प्रवास आहे. रात्रीच्या वेळी प्रवासात घरातील कोणी व्यक्ती सोबत नसल्यास असुरक्षितता जाणवते त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह आहे,’ असे प्रवासी नंदा काळे यांनी सांगितले. ‘महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा निर्णय चांगला आहे. चुकीच्या प्रवृत्तींचा वेळीच नायनाट करायला हवा. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढारलेल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे,’ असे मत प्रवासी पायल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले.

Exit mobile version