एसटी कर्मचाऱ्याने चार पैसे कमावण्यासाठी मागितली ९ महिने सुट्टी

एसटी कर्मचाऱ्याने चार पैसे कमावण्यासाठी मागितली ९ महिने सुट्टी

न्यूज डंका एक्स्क्लुझिव्ह

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सध्या वेतन मिळत नाही आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता, निराशा आहे. दोन कर्मचाऱ्यांनी ही निराशा पत्राद्वारे व्यक्त केली आहे. मंगेश गोरले आणि सुदर्शन टेकाळे यांनी पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. टेकाळे यांनी आपल्याला वेतन मिळत नसल्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी वर्षभर रजा द्यावी, अशी मागणी केली आहे तर गोरले यांनी आपल्याला विद्युत वितरण कंपनीचे बिल भरणे शक्य नसल्याचे विद्युत पारेषण कंपनीला कळविले आहे.

यवतमाळ येथील उमरखेड आगारात वाहक असलेले टेकाळे यांनी विभाग नियंत्रकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही महिन्यांपासून पगार नसल्यामुळे मला शिक्षण, किराणा, दवाखाना याचा खर्च भागविणे कठीण झालेले आहे. पगार वेळेवर होईल, अशी शक्यता नाही. संपूर्ण कुटुंबाची माझ्यावर जबाबदारी असल्यामुळे मलाच पैसे कमाविण्याशिवाय पर्याय दिसत नाही. रजा किंवा पगार दिला नाही तर माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. तेव्हा मला १ सप्टेंबर २०२१ ते ३१ मे २०२२ या कालावधीसाठी रजा द्यावी किंवा पगारापोटी आगाऊ रक्कम द्यावी.

गोरले यांनी कारंजा, वाशिम येथील विद्युत पारेषण कंपनीच्या अभियंत्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. त्यात ते लिहितात की, मी आपल्या कंपनीचा नियमित ग्राहक असून माझे कोणतेही बिल प्रलंबित नाही. पण काही महिन्यांपासून मी ज्याठिकाणी काम करतो, त्या राज्य परिवहन महामंडळातील कामगारांचे वेतन झालेले नसल्याने थकित बिलाचा भरणा करणे शक्य नाही. तेव्हा एक कर्मचारी म्हणून मला सहकार्य करावे ही विनंती.

हे ही वाचा:

प्रतीक कर्पेंचा सरदेसाईंवर पलटवार

मध्य रेल्वेने केला ऑलिम्पियन महिला हॉकीपटूंचा गौरव

अरेरे! नवरा गेला, चिमुरड्यांचीही तिने केली हत्या

मंदिर हम खुलवायेंगे…भाजपचा नारा

मागे प्रवीण लढी या कर्मचाऱ्याने आपली निराशा एका मेसेजद्वारे सोशल मीडियावर व्यक्त केली होती, तेव्हा त्याला निलंबित करण्यात आले होते तर गणेश खटके या कर्मचाऱ्याने आम्हाला दारिद्र्यरेषेखाली सामावून घ्या, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच दोन पानी दीर्घ पत्र लिहिले होते.

सध्या एसटीची अवस्था अत्यंत बिकट असून एसटी महामंडळ कर्जाच्या बोज्याखाली दबले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासाठीही महामंडळाकडे पैसे नाहीत.

Exit mobile version