एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारामधील परिवहन मंडळाच्या एका चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) ही घटना घडली असून यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दिलीप हरिभाऊ काकडे असे या चालकाचे नाव असून त्यांनी आगारातच आत्महत्या केली आहे. ते शेवगाव आगारात चालक म्हणून कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटी बसच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी समोर आले. या घटनेची माहिती मिळताच डेपो अधिकारी व कर्मचारी यांनी डेपोत धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. आत्महत्या करण्याचे स्पष्ट कारण अद्यापही समजलेले नाही.
हे ही वाचा:
रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’
बंदूक रोखून जालन्यात लुटली बँक
‘थलैवा’ रजनीकांत हॉस्पटिलमध्ये
झुक्याने केले फेसबुकचे नव्याने बारसे
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही बीड आगारातील चालक तुकाराम सानप यांनी राहत्या घरात कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. पंढरपूर आगारातील दशरथ गिड्डे यांनीही आर्थिक समस्यांना कंटाळून आत्महत्या केली होती. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळच्या वेळी मिळत नसल्यामुळे कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी कर्ज घेतले आहे आणि वेतन वेळच्यावेळी न मिळाल्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेले कर्मचारी आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत.