गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमान्यांची रीघ

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमान्यांची रीघ

आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणवासी जय्यत तयारीला लागले असल्याचे समोर येत आहे. कोविडची भीती न बाळगता गणेश भक्तांनी बाप्पाचे स्वागत करण्याचे ठरवल्याने एसटीचे घाऊक बुकिंग झालेले दिसत आहे.

ठाणे आणि परिसरात गणेशोत्सवासाठी एस.टी महामंडळाच्या बसेसचे घाऊक प्रमाणात बुकिंग झालेले पाहायला मिळत आहे. या भागातून गणेशोत्सवासाठी तब्बल ५४५ बसेसचे बुकिंग करण्यात आल्याचे कळले आहे. यापैकी १२७ बसगाड्यांचे आरक्षण ग्रुप बुकिंग अथवा एखाद्या राजकीय पक्षाच्या लोकांकडून करण्यात आल्याचे कळले आहे.

कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी जातात. त्यामुळे यंदा देखील चाकरमान्यांनी खूप आधीपासून गणपतीसाठी बसचे आरक्षण करण्यास सुरूवात केली आहे. ठाण्याबरोबरच इतरही काही आगारांमधून या एस.टी बसेस सुटणार आहेत. ठाणे, बोरिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, भिवंडी, पालघर इत्यादी आगारांतून बस सुटणार आहेत. या बसगाड्या ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या दरम्यान निघणार आहेत.

हे ही वाचा:

काश्मिरला बसला भूकंपाचा धक्का

शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण

अश्रफ घनी ‘या’ देशात पळाले

तालिबानने कब्जा केल्यामुळे भारतातला सुकामेवा महाग होणार?

एस.टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव यांनी सांगितले की, “आमच्याकडे ठाणे विभागात ८०० बसगाड्या उपलब्ध आहेत. त्यापैकी ५४५ गाड्यांचे आरक्षण झाले आहे. त्यापैकी १२७ गाड्यांचे आरक्षण ग्रुप बुकिंगद्वारे झाले आहे, तर इतर गाड्यांचे आरक्षण एमएसआरटीसीच्या संकेतस्थळावरून झाले आहे. येणाऱ्या काळात आरक्षित गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.”

या बरोबरच त्यांनी कोविडची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने लोक गणेशोत्सवासाठी निघू शकत असल्याचे मत व्यक्त केले आहे. मागच्या वर्षी मात्र कोविडमुळे लोकांना बाहेर जाण्याची संधी मिळाली नव्हती. भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवासाठी अनेक दिवस आधी भाविक निघत असल्यामुळे ५ आणि ६ सप्टेंबर रोजी असलेल्या आरक्षणानुसार विविध आगारातून रोज एकूण १२ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याबरोबरच ७ सप्टेंबर रोजी ११० बसेस, ३३६ बसेस  अशाच प्रकारे विविध आगारातून बसेस सोडण्यात येणार आहेत. एस.टीच्या आरक्षणाला जुलै महिन्यापासून सुरूवात झाली होती.

एस.टीला गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. एस.टीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांचे वेतन देखील देण्यात आलेले नाही. गणेशोत्सवात वाढलेल्या महसूलाचा फायदा एस.टीच्या कर्मचाऱ्यांना होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एस.टी कर्मचारी आता वेतनासाठी बाप्पालाच साकडं घालत आहेत.

Exit mobile version