अखेर शिक्षकांवर बसप्रवास करण्याची मेहेरबानी

अखेर शिक्षकांवर बसप्रवास करण्याची मेहेरबानी

गेले काही दिवस रेल्वेप्रवासासाठी तगादा लावणाऱ्या शिक्षकांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा दिली नसली तरी दहावीचा निकाल आता अंतिम चरणात आल्यावर त्यांच्यासाठी बससेवा उपलब्ध करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दहावीच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये सामील असलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. आता ठाणे तसेच रायगड पालघर जिल्ह्यातून येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बस सोडण्यात येणार आहेत. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे बोलले जात आहे.

११ जूनपासून सुरू झालेल्या मूल्यांकन कामांची अंमलबजावणी करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा तपशील शाळांकडून मागविण्यात आला होता. परंतु पास मिळण्यास विलंब लागत असल्यामुळे, शिक्षकांनी जमेल तसे शाळा गाठली. शिक्षकांनी कामाला सुरुवात करून आता तब्बल २० पेक्षा जास्त दिवस लोटले. तेव्हा आता सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा शिक्षकांसाठी सुरू केलेल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नालासोपारा, पनवेल येथून या बस सोडण्यात येतील त्यात दादर, कुर्ला, भायखळा, अंधेरी याठिकाणी शिक्षकांना घेऊन येतील.

हे ही वाचा:

झोमॅटोचा आता ‘शेअर्स’चा ऑप्शन

बांधकामांची वसुली करणारा ‘वाझे’ कोण?

वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांविरोधात आगरी सेनेचा एल्गार

ठाकरे सरकारचा १५५ कोटींचा मीडिया घोटाळा?

लोकल सर्वसामान्यांसाठी बंद असल्यामुळे याआधी अनेक शिक्षकांना तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर शिक्षकांनी मजल दरमजल करत कायद्याला झुगारून देत शिक्षकांनी लोकलने प्रवास करण्यास सुरुवात केली. मूल्यांकन करायचे तर शाळेपर्यंत पोहोचणे हे शिक्षकांसाठी गरजेचे होते. लोकल तिकीट नाकारल्याने काही शिक्षक तिथूनच घरी परतले. तर काही शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी पदरचे ८०० ते १००० रुपये खर्च करून शाळा गाठली. तर काही शिक्षक लोकलने प्रवास करून दंड भरून शाळेपर्यंत पोहचले होते. बससेवा सुरू होण्याआधी शिक्षकांना झालेला मनस्ताप त्याचे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.

Exit mobile version