एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप अखेर बुधवारी मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला गेला आणि संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत पार पडली. त्यात एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. कृती समितीने ५ हजार रुपयांची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी ६५०० रुपयांची वाढ केली.
याआधी, एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या या संपामुळे एसटी प्रवाशांचे खूप हाल झाले. विशेषतः गणपतीसाठी गावाकडे निघालेल्या प्रवाशांना हाल सोसावे लागले. अनेक गाड्या बंद असल्यामुळे खासगी बसेससाठी जादा पैसे खर्च करून लोकांना जावे लागले. त्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी कर्मचारी कृती समितीशी बैठक घेतली. पण त्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. ती निष्फळ ठरल्यानंतर आंदोलक संपावर ठामच होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
ज्या कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबर २०२१मध्ये अडीच हजार, चार हजार आणि पाच हजार अशी वाढ दिली होती ती आता साडेसहा हजारापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना पाच हजार पगार आहे, त्यांना दीड हजार, चार हजार आहे त्यांना अडीच हजार आणि अडीच हजार असलेल्यांना चार हजार इतकी पगारवाढ मिळणार आहे.
ही मागणी पूर्ण झालेली असल्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दिवसभरात एसटीच्या २५१पैकी ९४ आगार बंद होते. ९२ आगारत अंशतः वाहतूक सुरू होती तर ६५ आगारांमध्ये पूर्णपणे वाहतूक सुरू होती. दिवसभर सुमारे ७० टक्के वाहतूक बंद होती. त्यामुळे २२ कोटींचा महसूल बुडाला.
या कृती समितीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील यांचा समावेश होता. त्यानंतर पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.