आधीच एसटीची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकित रकमेचा प्रश्न सुटलेला नाही, एसटीचा तोटा साडेपाच हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे, एसटी गाड्यांची दुरुस्तीअभावी वाईट अवस्था आहे. त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी येत आहे.
आता एसटीच्या अवस्थेचा असाच एक व्हीडिओ सध्या चर्चेत असून रस्त्यावरून चाललेली ही एसटी चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावरून ही एसटी बस तिरक्या रेषेत चालल्याचे दिसते आहे. काही अंतर चालून गेल्यावर या एसटीचा मागील भाग डावीकडून चाललेल्या एका दुचाकीस्वाराला धडकतो आणि तो दुचाकीस्वार खाली कोसळल्याचेही व्हीडिओत दिसते आहे.
जवळपास ४२ सेकंदांच्या या व्हीडिओत बस सुरुवातीपासूनच तिरकी चालताना दिसत आहे. तरीही चालकाला या बसमधील हा दोष लक्षात आलेला नाही असे दिसते. तरीही तो ती सदोष गाडी चालवत राहतो आणि त्यात या दुचाकीस्वाराला गाडीचा धक्काही बसतो. दुचाकीस्वार कमी वेगाने गाडी चालवत असल्यामुळे त्याला जास्त दुखापत झाली नसावी असे दिसते पण अशा सदोष गाड्या रस्त्यावर धावत असतील तर असे आणखीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा:
‘या’ दिवशी राम मंदिर भाविकांसाठी उघडणार
बापरे! …यासाठी मुलींनी दडवून ठेवला वडिलांचा मृतदेह
ज्यांनी शाळा उद्ध्वस्त केली त्यांनीच उभारली!
जवळपास ५ हजार एसटी बसेसचा कार्यकाल संपलेला आहे. त्या आता रस्त्यावर धावणे योग्य नाही. तरीही त्या चालविल्या जात आहेत असे कळते. अशा एसटी बसेस जर रस्त्यांवर धावत असतील तर त्यात बसलेल्या प्रवाशांचा आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांचाही जीव धोक्यात आहे, असे म्हणायला हरकत नाही.