हिंदूंच्या प्रदीर्घ संघर्षातून उभे राहिले श्रीराममंदिर

अयोध्या श्रीरामजन्मभूमी मुक्ती संग्राम : ऐतिहासिक मागोवा

हिंदूंच्या प्रदीर्घ संघर्षातून उभे राहिले श्रीराममंदिर

श्रीकांत पटवर्धन

अयोध्येत येत्या २२ जानेवारीला भव्य श्री राम मंदिरात श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होईल. त्या निमित्ताने ह्या सुमारे पाचशे वर्षांच्या संघर्षाचा ऐतिहासिक आढावा थोडक्यात घेण्याचा हा प्रयत्न. ह्या विषयावर सामान्यतः ज्या चर्चा होतात, किंवा जी मते व्यक्त केली जातात, त्यामध्ये बहुधा शहाबानो प्रकरणानंतर राजीव गांधीनी विवादित परिसराची कुलुपे उघडण्याचा घेतलेला निर्णय; (जो संभवतः शहाबानो प्रकरणात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यावर होत असलेल्या मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून (?) घेतला असावा असे मानले जाते) व त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा, व रामजन्मभूमी प्रश्नावरून सुरु केलेले आंदोलन (वि.हिं.परिषद, बजरंग दल आदी संघ परिवारातील संघटनांच्या माध्यमातून)  इथपासूनच चर्चेला सुरुवात होते.

एकूण आभास असा निर्माण होतो, की हे रामजन्मभूमी प्रकरण अगदी अलीकडच्या काळातले असून, त्यात मुख्यत्वे भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील इतर संघटना यांचाच काय तो सक्रीय सहभाग आहे किंबहुना ह्या वादाची निर्मिती ही त्यांचीच आहे. या लेखाचा हेतू मूळ प्रश्नाचा थोडा ऐतिहासिक मागोवा घेऊन हा आभास दूर करणे आणि मूळ इतिहास वास्तव स्वरुपात मांडणे हा आहे.
ह्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे असे :

१.

किमान ४९६ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी/पूर्वपीठिका: हा प्रश्न मुळात जसा अलीकडच्या काळातला राजकीय किंवा धार्मिक प्रश्न समजला जातो, तसा तो नाहीच आहे. इ. स. १५२८ मध्ये मुघल आक्रमक बाबर याचा सेनानी मीर बाकी याने अयोध्येतील राम मंदिर पाडले व त्या जागी मशीद बांधण्याचा प्रयत्न केला, इथपासून ह्या प्रश्नाची सुरुवात होते. श्रीराम हे भारतीयांच्या स्वत्वाचे, अस्मितेचे प्रतीक होते आणि अयोध्येतून , त्याच्या जन्मभूमितूनच  त्याचे अस्तित्व मिटवणे, उध्वस्त करणे, यामध्ये पराभूत भारतीयांना अवमानित करणे, त्यांचा देवही त्यांचे रक्षण करू शकत नाही, हे अत्यंत कठोरपणे दाखवून देणे, ठसवणे, हाच हेतू होता.

प्रत्येक युद्ध हे खरेतर मानसिक युद्ध च असते. जोवर पराभूत व्यक्ती / समाज आपला पराभव मानसिकदृष्ट्या स्वीकारत नाही, तोवर केवळ युद्धातील पराभव हा खरा पराभव नसतो. अयोध्येच्या बाबतीत नेमके हेच झाले. जरी अयोध्येतील मंदिर मीर बाकी (बाबराचा सेनानी) ने तोफा डागून उध्वस्त केले, तरीही  स्थानिक लोकांच्या प्रखर विरोधामुळे तिथे भव्य मशीद बांधण्याचे त्याचे स्वप्न मात्र पूर्ण  होऊ शकले नाही. जेता असूनही बाबर तिथे मशीद बांधू शकला नाही, ह्यावरूनच स्थानिकांचा विरोध किती जबरदस्त असावा, याची कल्पना येते. बाबराचा सेनानी मीर बाकी याने तिथे मुळात असलेले राम मंदिर पाडले, ह्याचा पुरावा खुद्द बाबराने काढलेल्या शाही फर्मानात च मिळतो. ह्या शाही फर्मानाचा अनुवादित सारांश असा:

शहेन शाह ए हिंद मलिक उल जहान बादशहा बाबर यांच्याहुकुमावरून अयोध्येतील रामजन्म स्थान पडून उध्वस्त करण्याची परवानगी दिली गेली आहे. हे स्थान नष्ट करून, त्यातून मिळालेल्या सामग्रीतून त्या जागी मशीद उभारण्याचे शाही आदेश आहेत. हिंदूस्थानातील अन्य भागातून कोणीही हिंदू अयोध्येत प्रवेश करू शकणार नाही हे काटेकोरपणे पहावे लागेल. जर असा कोणी हिंदू अयोध्येत आलेला दिसला आणि त्याच्या हेतूविषयी संशय आला, तर त्याला पकडून ठार करणे हे तुमचे कर्तव्य राहील.

ह्यावरून हे उघड आहे, की अयोध्येतील राम मंदिर पडून त्या जागी मशीद बांधणे, हे सोपे नव्हते. त्यामुळेच मुघल बादशहा बाबर याने बाहेरून आलेला कोणाही हिंदूला केवळ संशयावरून ठार मारण्याचे सक्त आदेश आपल्या सैनिकांना देऊन ठेवले.

२.

इथून सुरु होते एका प्रदीर्घ लढ्याची कहाणी. अयोध्येच्या (पराभूत) भारतीयांनी रामजन्मभूमी आक्रमकांच्या ताब्यातून मुक्त करून परत मिळवण्यासाठी लढलेल्या असंख्य युद्धांची कहाणी.
इ.स. १५२८ पासून इ.स. १९३४ पर्यंत च्या काळात इतिहासाला ज्ञात असलेली ७६ युद्धे रामजन्मभूमी मुक्तीसाठी लढली गेली. त्यांचा थोडक्यात तपशील असा –

बाबराच्या चार वर्षाच्या कारकिर्दीत (१५२८ ते १५३०) अयोध्येच्या लोकांनी  रामजन्मभूमी ताब्यात घेण्यासाठी चार युद्धे लढली. पुढे मुघल बादशहा हुमायून च्या सत्ताकाळात (१५३० ते १५५६) दहा, अकबराच्या कारकिर्दीत (१५५६ ते १५६६) वीस, औरंगझेबाच्या सत्ताकाळात (१६५८ ते १७०७) तीस, त्यानंतर मुघल साम्राज्याच्या पतनानंतर अयोध्येत नवाबांचा अंमल सुरु झाला. त्यामध्ये नवाब सादतअली च्या कारकिर्दीत (१७७० ते १८१४) पाच, नसिरुद्दीन हैदर याच्या काळात (१८१४ ते १८३६) तीन, नवाब वाजीद अली शाह ह्याच्या काळात (१८४७ ते १८५७) दोन युद्धे लढली गेली. त्यानंतर ब्रिटीश आमदानीतही  (१९१२ ते १९३४) दोन युद्धे रामजन्मभूमी मुक्तीसाठी लढली गेली. ह्यामध्ये विशेष म्हणजे वेळोवेळी लढल्या गेलेल्या ह्या युद्धांमध्ये असंख्य वेळा पराभूत होऊनही, भारतीयांनी रामजन्मभूमीचा ताबा परत मिळवण्याची आपली दुर्दम्य इच्छा, आकांक्षा जराही क्षीण होऊ दिली नाही.

असंख्य योद्ध्यांना वीरमरण येऊनही पुन्हा पुन्हा भारतीय योद्धे रामजन्मभूमीसाठी प्राणपणाने लढत राहिले. पिढ्यानपिढ्या चाललेला हा संघर्ष हेच दाखवून देतो,की हा काही एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी, एखाद्या वास्तूसाठी, झालेला संघर्ष नसून ह्यामध्ये त्यापेक्षा बरेच काही अधिक महत्वाचे, अधिक उच्च पातळीवरचे समाविष्ट आहे; ते आहे भारतीयांचे स्वत्व, अस्मिता, स्वाभिमान. भारतीयांचे भारतीयत्व त्यांच्या  राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू श्रीराम, श्रीकृष्ण व भगवान शंकर असल्याचे स्वर्गीय डॉ.राममनोहर लोहिया यांनी म्हटले होते. (लोहिया कोणी हिंदुत्ववादी नव्हते) त्याची इथे आठवण होते. अगणित पराभव पचवूनही पुनःपुन्हा उभे राहण्याची , लढण्याची प्रेरणा देणारे हे जे काही आहे, त्याची दखल कोणाही विचारी माणसाला घ्यावीच लागेल. जी प्रेरणा शतकानुशतके इतकी जिवंत राहते, ती निश्चितच तात्कालिक, कमी महत्वाची, दुर्लक्षणीय नाही.

३.

जगात इतरत्र घडलेल्या अशाच  ऐतिहासिक घटनांचा (उदाहरणादाखल) विचार : पोलंडवरील रशियन सत्ता (१६१४ ते १९१५) संपुष्टात आल्यानंतर इ.स.१९१८ मध्ये पोलिश जनतेने सर्वप्रथम जर कुठली गोष्ट केली असेल, तर ती म्हणजे वार्सा येथे शहराच्या मध्यभागी रशियनांनी उभारलेले Russian Orthodox Christian Cathedral जमीनदोस्त करणे, ही होय. ह्यात विशेष म्हणजे, हे करणारे पोलिश लोक स्वतः ख्रिश्चन होते व पाडलेल्या चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचीच पूजा/ उपासना  होत होती. असे असूनही त्यांनी रशियनानी बांधलेली ती वास्तू पाडली, कारण ते तिच्याकडे परकीय सत्तेचे, (त्यांच्या गुलामीची आठवण करून देणारे) प्रतीक म्हणून बघत होते, केवळ चर्च म्हणून नव्हे.

त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने केलेल्या अमानुष दुष्कृत्यांबद्दल पुढे जर्मन जनतेने प्रांजळपणे क्षमा याचना केली. त्याद्वारे त्यांनी हेच दाखवून दिले, की नाझीवादाला त्यांचा पाठींबा नव्हता, नाही. त्यांनी हिटलरला आपला म्हणून त्याचे समर्थन करण्याचा अट्टाहास केला नाही. अगदी ह्याच तऱ्हेने बघितल्यास (सध्याच्या) भारतीय मुस्लिमांनी मध्ययुगीन आक्रमक बाबर ह्याला स्वीकारण्याची, आपला मानण्याची काहीच गरज नाही. तत्कालीन संघर्ष हा केवळ हिंदू मुस्लीम संघर्ष नसून भारतीय आणि परकीय आक्रमक यांच्यातील संघर्ष होता, हे भारतीय मुस्लिमांनी समजून घेण्याची गरज आहे.

४.

इ.स.१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम : ह्यामध्ये जेव्हा हिंदू मुसलमान एकत्रितपणे ब्रिटिशांविरुद्ध लढले, त्यावेळी अयोध्येतील स्थानिक मुस्लीम नेता अमीर अली याने जाहीरपणे असे म्हटले  होते, की मुस्लिमांनी अयोध्येतील विवादित ढांचा आपल्या हिंदू बांधवाना सुपूर्द करावा. दुर्दैवाने १८५७ च्या संग्रामात भारतीयांचा पराभव झाला आणि ब्रिटिशांनी अमीर अली व त्याचा साथीदार रामचरण दास या दोघांना १८ मार्च १८५८ ह्या दिवशी एका चिंचेच्या झाडावर फाशी दिले. ते चिंचेचे झाड पुढे कित्येक वर्षे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक बनले व हिंदू मुस्लीम दोन्ही समाजांकडून पूजले जाऊ लागले. हिंदू मुस्लीम समाजांतील हे वाढते बंधुत्व ब्रिटीश शासकांच्या चिंतेचा विषय बनले, व त्यांनी शेवटी ते चिंचेचे झाड समूळ उपटून टाकले!  दुर्दैवाने इतिहासाच्या ह्या भागाकडे अजूनही म्हणावे तसे लक्ष दिले गेलेले नाही.

५.

६ डिसेंबर १९९२ मध्ये जी वास्तू पाडली गेली, ती मशीद नसून केवळ विवादित ढांचा होता: हे दर्शवणारे पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे "साहिफा ए चहल नसा इ बहादुरशाही हा बहादुरशहा (सतराव्या शतकाची अखेर / अठराव्या शतकाचा प्रारंभी होऊन गेलेला) च्या कारकिर्दीचे वर्णन करणारा ग्रंथ. त्या ग्रंथात असे स्पष्ट म्हटलेले आहे, की बादशहाच्या हुकुमाने (फर्माने बादशाही) ज्या मशिदी बांधण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये नमाज / खुत्बा पढण्याची परवानगी नाही. हिंदूंची (काफिरांची) त्यांच्या मथुरा, काशी, अयोध्या येथील मंदिरांवर फार श्रद्धा असते. (इथे मथुरेतील कृष्ण जन्मस्थान, अयोध्येतील रामजन्मभूमी, सीता रसोई व हनुमानस्थान यांचा उल्लेख आहे). ही सर्व स्थाने उध्वस्त करण्यात येऊन त्या ठिकाणी मशिदी बांधण्याचा उद्देश केवळ इस्लामी सत्तेचे सामर्थ्य दाखवण्याचा च होता. ह्या “मशिदीं”ना जुमा  / जमियत अदा करण्याची परवानगी नव्हती. मात्र त्यांमध्ये कुठल्याही मूर्तीची पूजा होणार नाही, तसेच शंखनाद केला जाणार नाही, असे सक्त आदेश होते.”

इस्लामच्या संकेतानुसार जिथे नियमित नमाज अदा केला जात नाही, ती “मशीद” असूच शकत नाही.  ह्यावरून हे लक्षात येते, की अयोध्या, मथुरा, काशी  ह्या पवित्र तीर्थक्षेत्रांत उभारण्यात आलेल्या “मशिदी” ह्या वास्तविक मशिदी नसून वेगळ्या उद्देशाने (पराभूताना अपमानित करण्याच्या, आणि सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने) उभारलेल्या वास्तू आहेत.

६.

अयोध्येच्या रामजन्मभूमी मुक्ती संघर्षात शीख समाजाचे लक्षणीय योगदान: हा आणखी एक दुर्लक्षित मुद्दा. शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मध्ये बाबराच्या पाशवी आक्रमणाचे, त्याने सतत केलेल्या मंदिर विध्वंसांचे  स्पष्ट वर्णन आहे. प्रभू श्रीरामाचा उल्लेख त्या ग्रंथात सुमारे २५०० वेळा आलेला आहे. औरंगझेबाच्या काळात अयोध्येतील बाबा वैष्णव दास (समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य) यांनी शीखांचे दहावे गुरु गोविंद सिंह यांची मदत मागितली. त्यावेळी फक्त अठरा वर्षांचे असलेले गुरु गोविंद सिंह यांनी आनंदाने ती मागणी मान्य केली, इतकेच नव्हे, तर ते स्वतः सैन्य घेऊन, प्रयाग मार्गे अयोध्येला आले. हिंदू शीख यांनी एकत्रितपणे औरंगझेबाच्या सैन्याचा (प्रथम जाबाझ खान, व पुढे सय्यद हसन अली यांच्या नेतृत्वाखालील सैन्याचा ) पराभव केला. “आलमगीर नामा” ह्या ग्रंथात हे नमूद आहे.

हे ही वाचा:

जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता

नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मुंबई पोलिसांना धमकीचा फोन!

२२ जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करूयात!

ठाण्यात रेव्ह पार्टी उधळली; १०० तरुणांना घेतलं ताब्यात

गुरु गोविंद सिंह यांच्या आत्मवृत्तपर ग्रंथात हे नमूद आहे, की ते स्वतःला श्रीरामाचा पुत्र “लव” याचे वंशज, तर गुरु नानक देव यांना श्रीरामपुत्र “कुश” याचे वंशज मानत. त्यांनी खालसा पंथाची स्थापना परकीय इस्लामी आक्रमकांशी (ज्यांना त्यांनी “तुर्क” म्हटले) लढून त्यांचा पराभव करण्यासाठीच केली. अयोध्येच्या रामजन्मभूमी मुक्ती संघर्षाचा इतिहास हा थोडक्यात असा आहे. तो संघर्ष कुठल्याही अलीकडच्या राजकीय पक्ष, वा संघटनेचे कर्तृत्व नाही. परकीय आक्रमक व इथला भारतीय समाज यांच्यातल्या शतकानुशतके चाललेल्या अस्मितेच्या संघर्षाचे वर्तमानात येऊन पोचलेले टोक आहे ते.  एकदा हे समजून घेतले, की रामजन्मभूमी आंदोलन हे केवळ हिंदूंचे नसून संपूर्ण भारतीय समाजाचे आहे, हे लक्षात येईल. सध्याच्या भारतीय समाजाच्या कुठल्याही घटकाने (मग तो कोणत्याही धर्माचा का असेना) स्वतःला मध्ययुगीन आक्रमकांशी “जोडण्याची” काहीच गरज नाही.  ह्या आंदोलनाला क्षुद्र पक्षीय राजकारण किंवा हिंदू मुस्लीम संघर्षाचा रंग येणे, हे तर अत्यंत दुर्दैवी ठरेल.

Exit mobile version