पाकिस्तानचा खेळ संपला; श्रीलंका अंतिम फेरीत

आशिया चषकासाठी भारताशी लढत

पाकिस्तानचा खेळ संपला; श्रीलंका अंतिम फेरीत

आशिया कप २०२३ स्पर्धेच्या सुपर ४ गटात गुरुवारी पाकिस्तानला नमवून श्रीलंकेने अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवारी, कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये दासून शानाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी लढत देईल.

फिटनेसने ग्रासलेल्या आणि फॉर्म गमावलेल्या खेळाडूंमुळे पाकिस्तानला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. भारताविरोधात २२८ धावांनी नामुष्कीपूर्ण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी श्रीलंकेविरोधात खेळ उंचावला होता. मात्र, तो त्यांना सामना जिंकून देण्यास अपुरा ठरला.

पाकिस्तानने त्यांच्या खेळाडूंमध्ये बदल केले. मात्र इमाम उल हकचे स्नायू दुखावल्यामुळे आणि सौद शाकील आजारी पडल्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यांच्याऐवजी फाखार झमान आणि अब्दुल्ला शाफिक यांना संधी मिळाली. हारिस रौफ आणि नसीम शाह हे दोघे खेळाडू जखमी झाल्यामुळे झमान खान याला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. फखारला मिळालेल्या दुसऱ्या संधीचे सोने करता आले नाही. प्रमोद मदुशान याने त्याला बाद केले. तर, शाफिकने तीन चौकार आणि दोन षटकारांसह ६९ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. बाबर आझम २९ धावांवर खेळत असताना दुनिथ वेल्लालाज याने त्याला यष्टिचित केले. तेव्हा पाकिस्तानची अवस्था २७.४ षटकांत पाच विकेट गमावून १३० अशी बिकट झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढत होता.

त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिकार अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी १०८ धावांची भागिदारी रचून पाकिस्तानची बाजू बळकट केली. रिझवान याने सहा चौकार आणि दोन षटकार लगावून ७३ चेंडूंमध्ये ८६ धावा ठोकल्या. मात्र ४२ षटकांनंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे सामना थांबवावा लागला. तेव्हा पाकिस्तानने सात विकेट गमावून २५२ धावा केल्या होत्या. इफ्तिकारने रिझवानच्या सहाय्याने ४० चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. मथीशा पाथिराना याने आठ षटकांत ६५ धावा देऊन तीन विकेट घेतल्या.

कुसाल परेरा याने सुरुवातीलाच चार चौकार मारून धडाकेबाज सुरुवात केली. मात्र त्याला शादाब खान याने बाद केले. त्यानंतर आलेल्या कुसल मेंडिस आणि पाथुन निस्सांका यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागिदारी रचली. सादाबने निस्सांका याला बाद करून ही जोडी फोडली. निस्सांका याने ४४ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सादीरा समरविक्रमा याने मेंडिससोबत १०० धावांची भागीदारी रचली. समाराविक्रमा याने ५१ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या. मात्र त्याला इफ्तिकार याने बाद केले. मेंडिसची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच इफ्तिकार याने त्याला बाद केले. मेंडिसने आठ चौकार आणि एक षटकार ठोकून ८७ चेंडूंमध्ये ९१ धावा केल्या. त्यानंतर विजयासाठी २० धावांची गरज असताना चारिथ आसालंका आणि धनंजय डीसील्व्हा मैदानात होते.

हे ही वाचा:

आधी ‘गदर २’ पाहा तरी…दिग्दर्शकाचा नसिरुद्दीन शहा यांना सल्ला

मराठा समाजाला एकनाथ शिंदे न्याय देऊ शकतात!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ देशभरातील पाच शहरांत प्रदर्शित करणार

शाहिनने एका षटकात केवळ चार धावा देऊन दोन विकेट घेतल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. तर, श्रीलंकेला विजयासाठी सहा चेंडूंमध्ये आठ धावा हव्या असताना झमान खान याला गोलंदाजी देण्यात आली. दोन चेंडूंमध्ये सहा धावा हव्या असताना चारिथ असालंका याने एक चौकार लगावला. तर, अखेरच्या चेंडूंवर दोन धावा काढून विजयश्री खेचून आणली.

Exit mobile version