भारताचा आघाडीचा खेळाडू किदम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रुपेरी यश संपादन केले. रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत सिंगापूरच्या लोह किन यूकडून पराभव पत्करावा लागल्याने श्रीकांतला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मात्र, त्याने या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करताना इतिहासाला गवसणी घातली.
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा तो भारताचा पहिला पुरुष खेळाडू ठरला.
सिंगापूरचा बॅडमिंटनपटू लोह कीन यूविरुद्धच्या सामन्यात श्रीकांतने भारताला रौप्यपदक जिंकून दिले. सुरुवातीपासूनच त्यांचा खेळ आक्रमक होता. ४३ मिनिटे चाललेल्या दोन सेटनंतर लोह कीन यूने वर्चस्व राखून धक्का दिला. श्रीकांत १५-२१, २०-२२ असा हरला. मात्र, तरीही त्याने इतिहास रचला.
त्याच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलनंतर, श्रीकांतने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, काही सामन्यांमध्ये खूप चांगले खेळूनही चांगली कामगिरी करू शकलो नाही. पण यातून मला खूप काही शिकायला मिळाले. मी वर्षानुवर्षे करत असलेल्या कठोर परिश्रम आणि सरावाने बॅडमिंटन कारकिर्दीत मी या टप्प्यावर पोहोचलो. तसेच, राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि जागतिक चॅम्पियनशिप यांसारख्या काही प्रमुख कार्यक्रमांसह २०२२ च्या संभाव्यतेचाही त्याने यावेळी उल्लेख केला.
या स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा मान एका भारतीय खेळाडूला मिळाला. श्रीकांतने ती कामगिरी करून दाखविली. याआधी, प्रकाश पदुकोण, बी. साईप्रणित, लक्ष्य सेन यांनी या स्पर्धेत ब्राँझ पदक विजेती कामगिरी केली होती, पण श्रीकांतने रौप्य जिंकत हा विक्रम मागे टाकला.
मलेशियातून स्थलांतरित झालेल्या लोहने सिंगापूरला पहिले सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, अनेक अव्वल खेळाडू असूनही मलेशियाने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले नाही.
हे ही वाचा:
मुंबईकरांच्या नशिबी खराबच रस्ते; कंत्राटदाराच्या फायद्यासाठी उणे दराच्या निविदा
हेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटलांना दिले हे उत्तर
तीन तास झाले; ऐश्वर्या रायची चौकशी सुरूच!
‘सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत’
२८ वर्षीय श्रीकांतच्या कारकिर्दीत २५६ विजयासह १४१ पराभवांचा समावेश आहे. श्रीकांत सध्या बॅडमिंटनचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून श्रीकांतला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदीजी ट्विट मध्ये म्हणाले की, ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. या विजयामुळे अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि बॅडमिंटनमध्ये आणखी आवड निर्माण होईल.