भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ४ गडी राखून पराभव केला. बुधवार, २८ जुलै रोजी कोलंबो येथील आर.प्रेमदास स्टेडियममध्ये हा सामना खेळला गेला. यावेळी भारतीय संघाने विजयासाठी ठेवलेले १३३ धावांचे लक्ष्य श्रीलंकन संघाने अगदी लीलया साध्य केले. या विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
बुधवारी श्रीलंके विरोधात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला कोविडचा चांगलाच फटका बसलेला दिसला. भारतीय संघातील कृणाल पंड्या या अष्टपैलू खेळडूला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास सहा ते आठ मुख्य खेळाडूंना विलगीकरणात पाठवले गेले. त्यामुळे आज चार खेळाडूंनी भारतीय संघात आपले पदार्पण केले.
हे ही वाचा:
भारताचे ‘भूत’ काढणार ‘साहेबांचा’ धूर
फी कपातीची घोषणा झाली, अध्यादेश केव्हा काढणार?
जनसेवेचा ध्यास, पुरग्रस्तांसोबत चार घास
भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी कर्णधार शिखर धवनच्या साथीने ऋतुराज गायकवाड याने ४९ धावांची भागीदारी रचली. पण अशातच गायकवाड २१ धावांवर बाद झाला. तर ४० धावा केल्यावर ढवनही माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या देवदत्त पडीकलने २९ धावा करत भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही यश आले नाही. त्यामुळे २० षटकात भारतीय संघाचा डाव १३२ धावांवर आटोपला.
१३३ धावांचे विजयी लक्ष्य साध्य करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाची सुरूवात डळमळीत झाली. सलामीवीर अविष्का फर्नांडो हा अवघ्या ११ धावा करून तंबूत परतला. मिनोद भानूका हा दुसरा सलामीवीर एकटा झगडताना दिसत असला तरी त्याला इतर कोणी म्हणावी तशी साथ दिली नाही. पण मधल्या फळीतील फलंदाज धनंजय डी सिल्वा याने नाबाद ४० धावा ठोकत श्रीलंकन संघासाठी विजयश्री खेचून आणली.
भारत आणि श्रीलंका दरम्यान मालिकेतील तिसरा सामना गुरूवार २८ जुलै रोजी खेळला जाणार आहे. हा या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना असून विजयी संघ चषकावर आपले नाव कोरणार आहे.