श्रीसंत आणि वादाचे जुने नाते

गौतम गंभीरसोबत झाला वाद

श्रीसंत आणि वादाचे जुने नाते

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि तेज गोलंदाज एस. श्रीसंत यांच्यात नुकताच वाद झाला. गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील लीजंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान दोघेही समोरासमोर आले होते. सामन्याच्या दरम्यानच दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला. श्रीसंत वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे.

हरभजनशी वाद

सन २००८मध्ये श्रीसंत याचा हरभजनसिंगशी वाद झाला होता. तेव्हा श्रीसंत आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळत होता आणि हरभजन मुंबई इंडियन्ससाठी खेळत होता. एका सामन्यादरम्यान दोघांमधील वाद इतका वाढला की, हरभजनने श्रीसंतला लाइव्ह सामन्यादरम्यानच कानशिलात लगावली. त्यामुळे हरभजनवर संपूर्ण हंगामात बंदी घालण्यात आली होती.

स्पॉटफिक्सिंगमध्ये अडकला

सन २०१३मध्ये आयपीएलदरम्यान राजस्थान रॉयल्सचा तेज गोलंदाज एस श्रीसंत आणि अन्य साथीदार अजित चंदिला आणि अंकित दिवाण यांना ताब्यात घेतले गेले. या सर्वांना आयपीएलदरम्यान स्पॉटफिक्सिंगच्या आरोपात दोषी मानले गेले होते. बोर्डाच्या चौकशीत सर्व आरोप सिद्ध झाले आणि श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली. मात्र २०१५मध्ये दिल्ली न्यायालयाने मोक्का कायद्याखाली स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून श्रीसंतची पुराव्याअभावी मुक्तता केली. बीसीसीआयने त्यानंतर श्रीसंतवरील बंदीचा कालावधी सात वर्षांवर आणला. बंदीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये केरळचे प्रतिनिधीत्व केले.

बिग बॉसमध्ये मित्रांशी भांडण

श्रीसंतने सन २०१८मध्ये बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. त्यादरम्यान त्यांचे अभिनेते करणवीर बोरासह अन्य सहकाऱ्यांशी भांडण झाले होते. बोरा आणि श्रीसंत सुरुवातीला मित्र होते, मात्र नंतर नंतर त्यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले. त्यांच्या वर्तणुकीमुळे प्रेक्षकही हैराण झाले होते.

फसवणुकीचा आरोप

गेल्या महिन्यात श्रीसंतवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजीव कुमार आणि रमेश किनी यांनी २५ एप्रिल २०१९ रोजी श्रीसंतसोबत एक स्पोर्ट्स अकॅडमी उघडण्याचा दावा करून १८ लाख ७० हजार रुपये घेतले होते, अशी तक्रार सतीश गोपालन यांनी केली आहे. या प्रकरणी ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात श्रीसंतही आरोपी आहे.

हे ही वाचा:

नोकरी सोडली, कायद्याचा अभ्यास केला आणि वडिलांच्या मारेकऱ्यांना दिली शिक्षा

नरेंद्र मोदींनी खासदारांना सांगितलं, मोदीजी नका म्हणू मोदी म्हणा

नो वन किल्ड दिशा…

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

आता गंभीरसोबत वाद

गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात रंगलेल्या लीजंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान श्रीसंत आणि गंभीर यांच्यादरम्यान वाद झाला. श्रीसंतच्या म्हणण्यानुसार, गंभीरने त्याला फिक्सर म्हटले. यावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. तर, श्रीसंतने सांगितले की, मी गंभीरला काहीच बोललो नव्हतो. केवळ तू का रागवत आहेस, असे विचारले होते. गंभीरने या प्रकरणी अद्याप काहीच खुलासा दिलेला नाही. मात्र गंभीर यांनी एक छायाचित्र पोस्ट करून ‘हसा. जेव्हा काही जण केवळ आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात,’ अशी उपहासात्मक पोस्ट केली आहे.

Exit mobile version