पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळणारे अरुणकुमार सिन्हा यांचे निधन

एसपीजीचे प्रमुख म्हणून जबाबदारी पाहात होते

पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळणारे अरुणकुमार सिन्हा यांचे निधन

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG चे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे निधन झाले. गुरुग्राम येथील रुग्णालयात त्यांनी ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, अशी माहिती समोर आली आहे. २०१६ पासून अरुण कुमार सिन्हा हे SPG चे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

अरुण सिन्हा हे गेल्या काही महिन्यांपासून यकृताशी संबंधित आजारांवर उपचार घेत होते. या वर्षी ३० मे रोजी SPG प्रमुख म्हणून सिन्हा यांच्या निवृत्तीच्या एक दिवस आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC), त्यांना आणखी एक वर्षासाठी पुन्हा नोकरी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. ते २०१६ पासून एसपीजी प्रमुख म्हणून काम करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते.

अरुण सिन्हा यांनी यापूर्वी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले होते. ते केरळचे डीसीपी कमिश्नर, इंटेलिजन्स आयजी आणि तिरुवनंतपुरम मध्ये प्रशासन आयजी देखील होते. मालदीव येथे राष्ट्रपती अब्दुल गयूम यांच्या हत्या प्रकरणाची उकल केली होती. त्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. त्यांनी हत्येच्या आरोपींना दिल्लीतून पकडले होते. तेव्हा सिन्हा केरळमध्ये तैनात होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले होते.

हे ही वाचा:

इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना पूर्णविराम; संजय राऊतांनी सांगितले कारण

सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा

राणे-कीर्तिकरांवर चिडून ठाकरेंनी काढले वड्याचे तेल वांग्यावर…

सौरव गांगुलीच्या चरित्रपटामध्ये रणबीरऐवजी आयुष्मान?

SPG म्हणजे काय?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीवर असते. या गटाची स्थापना १९८५ मध्ये झाली होती. एसपीजी पंतप्रधानांचे घर, कार्यालय, कार्यक्रम, देशात किंवा परदेशात कुठेही भेटी दरम्यान पंतप्रधानांची सुरक्षा पाहते.

Exit mobile version