राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन राज्यात विविध विभागांच्या मार्फत विकासकामे सुरु आहेत. नागरिकांच्यादृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (व्हिसीद्वारे), राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे मेट्रो क्रमांक तीन च्या कामाला वेग द्या. नागरिकांच्यादृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. या कामासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देतानाच सातारा सैनिक स्कुलचे काम सुध्दा तातडीने मार्गी लावा. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या ‘रेवस ते रेडी’ किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा असेही अजित पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा:
राष्ट्रवादी अजितपवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!
डोंबिवली एमआयडीसीमधील ४२ केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश
धक्कादायक! बटरस्कॉच कोन आईस्क्रीममध्ये चक्क सापडले मानवी बोट!
रियासीतील हिंदू हत्याकांडाच्या निषेधार्थ अंधेरीत निदर्शने!
पवार यांनी यावेळी अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वडाळा येथील जीएसटी भवन,पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.