नक्षलग्रस्त भागातील जवानाची स्वप्नपूर्ती; अबूझमाड मल्लखांब ऍकॅडमी ‘इंडियाज गॉट टॅलेंट १०’ची विजेती

जिंकले २० लाखांचे इनाम आणि चमचमणारी कार

नक्षलग्रस्त भागातील जवानाची स्वप्नपूर्ती; अबूझमाड मल्लखांब ऍकॅडमी ‘इंडियाज गॉट टॅलेंट १०’ची विजेती

‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या १०व्या सिझनची विजेती ठरली आहे, अबूझमाड मलखांब अकॅडमी. सोनी टीव्हीवरील या कार्यक्रमात भारतातील वेगवेगळे कलाकार आपल्या कलांचे प्रदर्शन करतात. तर, शिल्पा शेट्टी, किरण खेर आणि बादशाह त्यांचे परीक्षण करतात. ग्रँड फिनालेमध्ये करण जोहरही उपस्थित होता. य़ाचे श्रेय जाते ते मनोज प्रसादला. नक्षलग्रस्त भागात स्पेशल टास्क फोर्समध्ये काम करणाऱ्या मनोजने गेल्या ७ वर्षात स्वतः मल्लखांब शिकल्यानंतर आदिवासी मुलांना हा खेळ शिकविला आणि त्यातून हे यश संपादन केले.

एरिअल मल्लखांब ग्रुप ‘अबूझमाड मल्लखांब अकॅडमी’ने विजेतेपदाचा मान पटकावला आहे. त्यांना ट्रॉफीसह २० लाख रुपयांचे बक्षीस आणि एक आर्टिगा गाडी मिळाली आहे. अबूझमाड मल्लखांब अकॅडमीने संपूर्ण कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस सादरीकरण केले. त्यांना पाहून परीक्षकांच्या डोळ्यांचेही पारणे फिटले. ‘रागा फ्युजन’ हे पहिले उपविजेता ठरले. त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर, दुसऱ्या उपविजेत्या ठरल्या ‘गोल्डन गर्ल्स’. त्यांना पाच लाख रुपये मिळाले.

हे होते अंतिम फेरीतील सहा स्पर्धक

‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या अंतिम फेरीत सहा स्पर्धकांनी धडक दिली होती. त्यात मुंबईतून ‘झीरो डिग्री’, छत्तीसगढमधील एरिअल मल्लखांब ग्रुप ‘अबूझमाड मल्लखांब अकादमी’, कोलकात्यातील ‘गोल्डन गर्ल्स’, एक्रो डान्सर्स ‘द एआरटी’, इंडियन क्लासिकल फ्युजन बँड ‘रागा फ्युजन’ आणि नागालँडचा ‘महिला बँड’ यांचा समावेश होता.

हे ही वाचा:

विराटने शतक ठोकले, पण दक्षिण आफ्रिकेचे शतकही नाही

एक कोटीची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला रंगेहाथ पकडले!

शेतांत आग लावण्यास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यालाच राब जाळायला लावले!

गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!

मनोज प्रसादने केली ही कमाल

 

छत्तीसगडसारख्या नक्षलग्रस्त भागात स्पेशल टास्क फोर्समध्ये काम करणारा मनोज प्रसाद हा या यशाचा खरा वाटेकरी आहे. २०१६मध्ये तो प्रथम मल्लखांब शिकला तेही मुंबईत दादरमध्ये. दादरच्या समर्थ व्यायाममंदिरात उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मल्लखांबाचे धडे घेतले पण ती त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली.

 

त्याने मल्लखांबाचे घेतलेले शिक्षण न सोडता ते नक्षलग्रस्त भागातील आदिवासी मुलांना दिले. नक्षलग्रस्त भागात गस्त घालायची आणि नंतरच्या वेळेत मल्लखांबाचे प्रशिक्षण घ्यायचे आणि मुलांनाही शिकवायचे असा त्याचा कार्यक्रम होता. या मुलांना मल्लखांब शिकविण्यासाठी त्याने स्वतः काही कारागीरांच्या मदतीने मल्लखांब तयार केले. विविध आकाराचे छोटे मोठे मल्लखांब तयार करून त्यावर तो सर्वांना मल्लखांब शिकवू लागला.  त्यासाठी त्याने पदरमोड करण्यासही मागेपुढे पाहिले नाही.

 

नारायणपूरमध्ये त्याने रामकृष्ण आश्रमात मल्लखांबाची व्यवस्था केली, मुलांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि तिथेच मग मल्लखांबाचे धडे मुले गिरवू लागली. सलग चार वर्षे अथक मेहनत घेऊन मनोजने या मुलांना शिकवले. सुट्टीच्या दिवशीही मल्लखांब, गस्त घालून आल्यावर मल्लखांब. त्याच्या डोक्यात मल्लखांबाचे इतके वेड भिनले की, त्याने या मुलांना मग स्पर्धांत उतरविण्यास सुरुवात केली. अनेक स्पर्धांत मनोजच्या मार्गदर्शनाखाली शिकणारी मुले पदके जिंकू लागली.

 

कोरोनाच्या काळात ही मुले आपापल्या घरी निघून गेली होती. आश्रम, शाळाही बंद होत्या. मग अशा परिस्थितीत त्याने काही मुलांना आपल्या घरी थांबवले, त्यांची सगळी व्यवस्था स्वतःच्या पैशातून केली. याच मुलांच्या मेहनतीच्या जोरावर आता इंडियाज गॉट टॅलेंट या स्पर्धेत त्याने मल्लखांबाचे सर्वोत्तम प्रदर्शन करत विजेतेपदाचा किताब जिंकला.

Exit mobile version