शपथविधीसाठी खास ‘संत तुकाराम महाराज केशर पगडी’ तयार

शपथविधीत फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांसाठी या पगडीसह आणखी काही पगड्या तयार केल्या आहेत

शपथविधीसाठी खास ‘संत तुकाराम महाराज केशर पगडी’ तयार

विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळालेल्या महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर राज्यपालांनी गुरुवारी शपथविधीसाठीचे आमंत्रण दिले आहे. दरम्यान, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले असून यासाठीची तयारी मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे.

महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार, ५ डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून देशभरातील मान्यवर नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांसाठी खास संत तुकाराम महाराज केशर पगडी तयार करण्यात आली आहे. तसेच, यासह पगड्यांच्या इतर चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडला जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘पुढारी’ने दिले आहे.

पुण्यातील गिरीश मुरुडकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या सर्व पगड्या तयार केल्या आहेत. यातील ‘संत तुकाराम महाराज केशर पगडी’ ही खास सुती कापडात बनवली आहे. शपथविधीत फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांसाठी या पगडीसह आणखी काही पगड्या तयार केल्या आहेत. गिरीश मुरुडकर फेटेवाले यांना महायुतीच्या घटकपक्षांकडून या विशेष पगड्यांसाठीची ऑर्डर देण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज केशर पगडीसह राजबिंडा केशरी फेटा, गुलाबी फेटे, विशेष फेटे, उपरणेही तयार केले आहेत.

गिरीश मुरुडकर माहिती देताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच आम्हाला महायुतीकडून फेटे आणि पगड्यांसाठी ऑर्डर येण्यास सुरुवात झाली. तसेच, मागणीनुसार खास फेटेही तयार ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या सर्व फेटे, पगड्यांचे काम सुरू केले गेले आहे. गुलाबी शाही फेटे, व्हीआयपी डिझायनर फेटे, उपरणेही तयार केले आहेत.

हे ही वाचा..

पुतीन यांना ‘मेक इन इंडिया’ची भुरळ!

पश्चिम बंगालमधून २२७७ कंपन्यांनी केले स्थलांतर

संभल हिंसाचार : ३३ आरोपींची तुरुंगात रवानगी

मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद तांत्रिक, आम्ही एकत्र निर्णय घेऊ!

दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असून महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’ शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.

Exit mobile version