स्पॅनिश पर्यटक महिलेवर सात जणांनी केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेला चाकूचा धाक दाखवून तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या एफआयआरची प्रत इंडियन एक्स्प्रेसला मिळाली असून त्यातूनच तिच्यावर गुदरलेल्या धक्कादायक प्रसंगाचे वर्णन समोर आले आहे.
१ मार्च रोजी २८ वर्षीय स्पॅनिश पर्यटक महिलेवर रांचीपासून ३०० किमी अंतरावर असेलल्या कुरुमहाट भागात सामूहिक बलात्कार झाला. ही महिला तिच्या पतीसोबत एके ठिकाणी तंबू उभारून झोपली असताना ही दुर्घटना घडली. स्थानिक आरोग्य केंद्रात २ मार्च रोजी पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी तिने तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाबाबत सांगितले. याची नोंद एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.
एफआयआरमध्ये नोंद केल्यानुसार, सर्वात प्रथम तीन पुरुषांनी पीडित महिलेच्या पतीसोबत भांडण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पतीचे हात बांधून त्याला मारहाण केली. त्यानंतर चौघांनी चाकूचा धाक दाखवून तिला उचलले. तिला मैदानावर फेकले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर सातही जणांनी वारंवार बलात्कार केला. या सर्वांनी मद्य प्राशन केले होते. संध्याकाळी साडेसात ते रात्री १० वाजेपर्यंत ही घटना घडली, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
‘त्या मालिकेने दिली आयुष्याला कलाटणी’
शेख शाहजहान याला सीबीआयकडे सोपवण्यास प. बंगालचा नकार
ओडिशात भाजप-बिजू जनता दलाची आघाडी?
२०२३ च्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ
ते गावात का थांबले?
‘आमच्या प्रवासादरम्यान आम्ही डुमका गावातील कुमराहत गावात पोहोचलो होतो. तिथे पोहोचायला आम्हाला थोडा उशीर झाल्याने आम्ही तिथेच जवळपास जंगलच्या रस्त्यावर तात्पुरता तंबू उभारून रात्रभर राहण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी सात वाजता आम्हाला तंबूबाहेर संशयास्पद आवाज ऐकू आले. त्यानंतर साडेसातच्या सुमारास काही जण दोन मोटारसायकलवरून आले. त्यांनी तंबूबाहेर थांबवून आम्हाला हॅलो फ्रेंड्स अशी हाक मारली.
आम्ही टॉर्च घेऊन बाहेर आलो तेव्हा पाच जण आमच्याजवळ धावत येत असल्याचे आणि आणखी दोघे आमच्या तंबूजवळ येत असल्याचे दिसले. ते स्थानिक भाषेत बोलत होते आणि अधुनमधून काही इंग्रजी शब्दांचा वापर करत होते,’ असे या महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून एक स्विस सुरा, घड्याळ, हिऱ्याची प्लॅटिनम अंगठी, एक चांदीची अंगठी, इअरपॉड्स, काळी पर्स, क्रेडिट कार्ड, सुमारे ११ हजार रुपये, ३०० अमेरिकी डॉलर, स्टीलचा चमचा आणि फोर्क हिसकावून घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे.
‘भारतीयांनी मला चांगली वागणूक दिली’
या घटनेचा महिलेला धक्का बसला असला तरी तिने आपला पुढचा जगप्रवास सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. मंगळवारी हे जोडपे बिहारमार्गे नेपाळला रवाना झाले. नेपाळला रवाना होण्यापूर्वी तिने आपल्याला भारतीय व्यक्तींबाबत कोणतीही तक्रार नाही, असे स्पष्ट केले. तिने आतापर्यंत भारतातील २० हजार किमीचा प्रवास सुरक्षितरीत्या पूर्ण केल्याचे सांगितले. ‘भारतीय खूप चांगले आहेत. मी त्यांना दोष देणार नाही, पण मी गुन्हेगारांना दूषणे देईन. भारतीयांनी मला खूप चांगली वागणूक दिली. ते माझ्याशी खूप प्रेमळपणे वागले,’ असे या स्पॅनिश महिलेने म्हटले आहे.
‘ती जागा शांत आणि सुंदर होती, त्यामुळे आम्ही तिकडे रात्र व्यतित करण्याचा निर्णय घेतला. इथे एकटे राहण्यास आम्हाला काही अडचण दिसली नाही,’ अशीही कबुली तिने दिली. ही महिला गेल्या सहा वर्षांपासून प्रवास करते आहे. ‘मी गेल्या सहा महिन्यांपासून भारतात असून आतापर्यंत मी येथे २० हजार किमीचा प्रवास केला आहे. मला कुठेच काही समस्या जाणवली नाही. हे पहिल्यांदाच घडले,’ अशीही ही महिला म्हणाली. ‘माझ्याकडे भारताच्या चांगल्या आठवणी आहेत,’ असेही तिने नमूद केले.