आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. साउथ आफ्रिकन महिला क्रिकेट संघासोबत झालेल्या करो या मरो सामन्यामध्ये भारतीय संघाला अखेरच्या चेंडूवर हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकन संघाने भारतीय संघाचा ३ विकेट्स राखून पराभव केला आहे.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीच्या फलंदाज स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या दोघींनीही अर्धशतक करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. स्मृती मानधनाने ७१ धावा केल्या. तर शेफाली वर्मा ५३ धावा करून बाद झाली. पुढे मिताली राज (६८) आणि अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौर (४८) यांनी भारताचा डाव सावरला. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ५० षटकांमध्ये २७४ धावा धावफलकावर चढवल्या.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली
‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ
‘२४ महिन्यांत ३८ मालमत्ता! मुंबईला ते कसं लुटतात हे उघड झालं’
‘महाराष्ट्र बारव मोहीम’ सुरू करणाऱ्या रोहन काळेंच पंतप्रधान मोदींकडून कौतुक
२७५ धावांचे विजयी लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानात उतरलेल्या साउथ आफ्रिकन संघाची सुरुवात अडखळत झाली. साउथ आफ्रिकेची सलामीची फलंदाज लेझेल ली ही अवघ्या ६ धावा करून धावबाद झाली. पण त्यानंतर लोरा वूलवर्ट हीने ८० धावांची तुफानी खेळी करत दक्षिण आफ्रिका संघाचा डाव सावरला. तिला लारा गुडॉल हिने ४९ धावा करत चांगली साथ दिली. पण त्यानंतर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा संघ अडखळताना दिसला. पण आफ्रिकन खेळाडू मिग्नन दू प्रीज एका बाजूने खिंड लढवत होती.
अखेरच्या षटकापर्यंत चाललेला या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील होते. दीप्ती शर्मा भारताकडून अखेरचे षटक टाकण्यासाठी आली. या शतकाच्या चौथ्या चेंडूवर मिग्नन दू प्रिज हिने मारलेला फटका हवेत गेला. त्यावर ती झेलबाद झाली. पण तो नो बॉल ठरला. हा सामन्याचा निकाल ठरवणार क्षण होता. यामुळे आफ्रिकन संघाला विजय सहज शक्य झाला. या विजयसह विश्वचषकात उपांत्य फेरीतले चार संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या चार संघांमध्ये उपांत्य फेरीचे सामने खेळले जाणार आहेत.