दक्षिण आफ्रिका प्रथमच पोहोचली फायनलमध्ये

अफगाणीस्तानवर मिळवला विजय

दक्षिण आफ्रिका प्रथमच पोहोचली फायनलमध्ये

टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेला रंगत चढली आहे. या स्पर्धेत गुरुवार, २७ जून रोजी अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंतिम सामन्याच्या तिकिटासाठी सामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानवर नऊ विकेट्स राखत दमदार विजय मिळवला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाला संघ योग्य तो न्याय देऊ शकला नाही. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकांत ५६ धावा करून गारद झाला. अफगाणिस्तानच्या ए. ओमरझईने सर्वाधिक १० धावा संघासाठी केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आलेली नाही. अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाने एकही षटकार या सामन्यात लगावलेला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे अफगाणिस्तान संघाने गुढगे टेकल्याचे दिसून आले. दक्षिण आफ्रिकेकडून एम. जन्सन याने तीन षटकांत १६ धावा देत तीन फलंदाजांना माघारी धाडले. तर, शामसी याने ११ चेंडूत सहा धावा देत तीन विकेट्स घेतल्या. रबाडा आणि नॉर्टजे यांनी प्रत्येकी दोन दोन फलंदाजांना तंबूत धाडले.

पुढे ५६ धावांचे लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक हा स्वस्तात माघारी परतला. त्याने आठ चेंडूत पाच धावा केल्या. मात्र त्यानंतर हेन्ड्रिकस आणि कर्णधार मार्क्रम यांनी अनुक्रमे २९ आणि २३ धावा करत दक्षिण आफ्रिका संघाला सहज विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानच्या फारुकीने एक विकेट घेतली. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. यानंतर आता दक्षिण आफ्रिका संघाच्या विरोधात भारत किंवा इंग्लंड यांच्यापैकी कोण खेळेल हे संध्याकाळी ठरणार आहे. हा अंतिम सामना २९ जूनला बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वाधिक पेपरफुटी!

प्रज्वल रेवण्णाला कोर्टाकडून आणखी एक झटका, जामीन अर्ज फेटाळला!

काँग्रेसने स्वहस्ते केले तोंड काळे…

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून; ‘हे’ मुद्दे गाजण्याची शक्यता

अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र उपांत्य फेरीत संघाला ती कामगिरी कायम ठेवता आली नाही. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमधील चारपैकी तीन सामने जिंकले होते. या संघाने युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनीविरुद्ध तीन सामने जिंकले. संघाला शेवटचा पराभव वेस्ट इंडिजविरुद्धच्या गटात झाला. यानंतर अफगाणिस्तानने सुपर-8मध्ये भारताविरुद्ध पराभवाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर संघाने पुढील दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती.

Exit mobile version