भारतीय महिला क्रिकेट संघ देशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडेमालिका खेळत आहेत. यातील पहिला सामना रविवार, १६ जून रोजी बेंगळुरूमध्ये खेळला गेला. यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला १४३ धावांनी पराभूत केले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र एक वेळ अशी आली की, हा निर्णय चुकला की काय, असे वाटू लागले. भारतीय संघाने ९९ धावांमध्येच पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर उपकर्णधार स्मृती मंधाना हिने सूत्रे हाती घेतली आणि तुफान खेळी करून संघाला अवघड परिस्थितीतून बाहेर काढले.
मंधाना हिने १२७ चेंडूंत ११७ धावांची खेळी केली. तिने एक षटकार आणि १२ चौकार लगावले. या जोरावर भारतीय संघाने आठ विकेट गमावून २६५ धावा केल्या. मंधाना हिने एकदिवसीय क्रिकेटमधील सहावे शतक ठोकले आणि विक्रमही केले. तर, दीप्ती शर्माने ३७ व पूजा वस्त्राकारने नाबाद ३१ धावा केल्या. तर, अयाबेंका खाका हिने तीन विकेट घेतल्या.
फलंदाजीनंतर भारतीय महिलांनी गोलंदाजीतही कमाल केली. फिरकीपटू आशा सोभना आणि दीप्ती शर्मा यांच्या गोलंदाजीपुढे आफ्रिकी महिला निष्प्रभ ठरल्या. आशाने २१ धावा देऊन चार विकेट घेतल्या. तर, दीप्तीने १० धावा देऊन दोन विकेट घेतल्या.
आफ्रिकेचा संघ ३७.४ षटकांतच आटोपला
२६६ धावसंख्येचा पाठलाग करताना उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ १२२ धावांतच आटोपला. त्यांनी हा सामना १४३ धावांनी गमावला. आफ्रिकेचा संघ केवळ ३७.४ षटकेच खेळू शकला. मंधाना हिला सामनावीर पुरस्कार दिला गेला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पुढचा सामना १९ जून रोजी होईल. ही मालिका बेंगळुरूमध्येच खेळली जात आहे.
मंधानाकडून विक्रमी खेळी
मंधाना हिने मार्च २०२२नंतर पहिल्यांदाच शतक ठोकले आहे. या खेळीनंतर मंधाना हिने भारताकडून सर्वाधिक शतक हरमनप्रीत कौरला मागे टाकले. हरमनने पाच शतके ठोकली आहेत. तर, सात शतके ठोकून मिताली राज अव्वल स्थानी आहे.
मंधाना हिने पहिल्यांदाच देशात शतक ठोकले आहे. तिने याआधीची सर्व पाचही शतके भारताबाहेर ठोकली आहेत. तिने दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेविरोधात १०० धावसंख्या पार केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देशात आणि परदेशात दोन्ही ठिकाणी शतके ठोकणारी ती दुसरी महिला ठरली. तिच्या आधी ही कामगिरी शार्लोट एडवर्ड्स हिने केली होती. याशिवाय, मंधाना ही बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर शतक ठोकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. २०१८च्या भारतीय महिला संघाच्या सलामीवीरांपैकी केवळ मंधाना शतक ठोकू शकली आहे. तिच्याशिवाय कोणत्याही सलामीवीराने शतक ठोकलेले नाही.
हे ही वाचा:
काश्मीरप्रमाणे जम्मूमध्येही ‘शून्य दहशतवाद धोरण’
ईव्हीएम मशीन मोबाईलद्वारे हॅक होऊ शकते का?
वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या!
विधानसभेपूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपणार!
मंधाना ही भारतात सर्वोत्तम एकदिवसीय धावसंख्या उभारणारी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने मितालीचा (१०९)चा विक्रम मोडला. मितालीने सन २००९मध्ये वेस्ट इंडिजविरोधात ही कामगिरी केली होती. मंधाना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारी ती सहावी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. १० हजार ८६८ धावांसह मिताली राज अग्रस्थानी आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर शार्लोट एडवर्ड्स (१०२७३) आणि तिसऱ्या क्रमांकावर सूजी बेट्स (९९०४) आहे.