ईव्हीएमवर दोन वेळा केंद्रात सत्ता भोगली, आता ओरडत आहेत!

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर टीका

ईव्हीएमवर दोन वेळा केंद्रात सत्ता भोगली, आता ओरडत आहेत!

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज (१० डिसेंबर) मारकडवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांची भेट घेवून सभेतून संवाद साधला. भाजपाचे माजी आमदार राम सातपुते, सदाभाऊ खोत देखील सभेला उपस्थित होते. गोपीचंद पडळकर यांनी सभेला संबोधित करताना मविआच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

मारकडवाडीतील लोकांना बॅलट पेपरवर मतदान हवे आहे, अशी एकच बाजू महाराष्ट्रासमोर जात आहे. तुम्हाला बॅलट पेपरवर मतदान हवे आहे का?, असा प्रश्न त्यांनी सुरवातीला सभेतून विचारला. यावर उपस्थित असणाऱ्या लोकांनी हात वर करून नकार दिला. धनगर समाज निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात आहे, असे वातावरण तयार करण्याचे पाप शरद पवारांनी केल्यामुळे मी आज मारकडवाडीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. १०० शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आला असल्याचे ते म्हणाले.

राजीनामा देणार म्हणतात, तर त्यांनी सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील यांचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर ईव्हीएम विरोधात आंदोलन करावे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी देखील राजीनामा द्यावा अन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पडळकर यांनी विरोधकांना केले.

ते पुढे म्हणाले, ईव्हीएमच्या नावाने हे ओरडत आहेत, मात्र दोन वेळा यांनी त्यावर केंद्रात सत्ता भोगली. २००९ ला शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून ईएव्हीएमवर निवडून गेले. ५ वर्षे येथील प्रतिनिधी होते, तेव्हा, मारकडवाडीत शरद पवार किती वेळा आले, असा सवाल उपस्थित करत संधी साधण्यासाठी शरद पवार याठिकाणी आल्याचे दिसून येत आल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा :

ममता बॅनर्जींच्या आमदाराकडून बाबरी मशीद बांधण्याची घोषणा, १ कोटीही देणार!

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

शरद पवारांचा पक्ष म्हणजे गुंड, लुटारुंची टोळी; ते गाडायचे काम देवाभाऊने केले

भूसुरुंग स्फोटात सुरक्षा जवान हुतात्मा!

२०१९ मध्ये बारामतीमधून मी उभा होतो, माझे डीपोजिट जप्त झाले. ईव्हीएममध्ये जर घोटाळा असता तर माझे डीपोजिट जप्त झाले असते का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अमेरिकेमध्ये ईव्हीएमचा वापर केला जात नाही, असे विरोधक सांगत आहेत. मात्र, अनेक देशात ईव्हीएमवर निवडणुका होत आहेत, यामध्ये अमेरिकेतील काही राज्यांचाही समावेश आहे. एवढेच काय, राहुल गांधींचे आजोळ असलेले इटलीमध्ये देखील ईव्हीएमवर निवडणुका होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवारांचे राजकारण हे विश्वासघातकी आहे हे सर्वांना माहिती आहे. मात्र, मारकडवाडीमध्ये त्यांनी लक्ष घातल्यानंतर त्यांची अक्कल संपलेली आहे हे स्पष्ट झाले आहे. २०१७ साली मुंबईमध्ये मविआच्या नेत्यांना माझ्याकडून आव्हान करण्यात आले होते. निवडणूक आयोगाकडून आव्हान करत ईव्हीएम हॅक होत असेल तर दाखवून द्या. मात्र, २०१७ ते २०२४ पर्यंत एकही माणूस पुढे आला नाही. ते पुढे म्हणाले, ईव्हीएमच्या नावाने लोकांना फसवण्याचे काम विरोधक करत आहेत.

ईव्हीएम हॅक केली, असे हे म्हणत आहेत तर होय ईव्हीएम हॅक केली पण ती आमच्या लाडक्या बहिणींनी केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनेमुळे या सर्व ईव्हीएम हॅक झाल्या आहेत. माझ्या मित्राने एक मेसेज पाठवला, ते म्हणजे, ‘महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल अशी शरद पवारांना होती आशा, परंतु मारकडवाडीतील लोकांनी त्यांच्या तोंडात घातल्या माशा. पवारांचा राजकीय जीवनाचा केला तमाशा, म्हणून पवार वाजवत आहेत ईव्हीएमचा ताशा’ असा टोला देखील गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना लगावला.

Exit mobile version