तब्बल ३० तासानंतर सोरेन परतले रांचीला

समर्थक आमदारांची घेतली बैठक, पत्नी कल्पना सोरेन यांची उपस्थिती चर्चेची

तब्बल ३० तासानंतर सोरेन परतले रांचीला

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे अखेर ३० तासांपेक्षा जास्त काळानंतर आपल्या रांची येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले. सोरेन यांनी कथित जमीन फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात सोमवारी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ईडीने झडती घेतली होती. त्यानंतर सोरेन हे कुठे आहेत? या बद्दल माध्यमामध्ये चर्चा सुरु होती.  मुख्यमंत्री ३१ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहिल्यास त्यांना ईडीकडून अटक केली जाऊ शकते, अशी अटकळ असताना सोरेन यांनी सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या आमदारांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन याही बैठकीला हजर होत्या.

जर सोरेन यांना अटक झाली तर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या मुख्यमंत्री होऊ शकतात अशीही चर्चा आहे. जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीतील सर्व आमदारांना रांचीमध्ये राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. जेएमएम, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे झारखंडमधील सत्ताधारी पक्ष आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती आणि जमीन प्रकरण या संदर्भात सोरेन यांची बुधवारी चौकशी होणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे जेएमएमचे सरचिटणीस आणि प्रवक्ते विनोद कुमार सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा..

अभिमानाचा क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारशासाठी नामांकित

भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या पीएफआयच्या १५ जणांना फाशी!

अमेरिका संतापली; लवकरच इराणसमर्थक गटांवर हल्ले करणार

रामदेवबाबांचा मेणाचा पुतळा न्यूयॉर्कच्या म्युझियममध्ये बसणार

२० जानेवारी रोजी ईडीने सोरेन यांची रांची येथील शासकीय निवासस्थानी चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना १० वे समन्स देण्यात आले होते. सोमवारी रात्री ईडीच्या पथकाने जमीन प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात चौकशीसाठी सोरेन यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोरेन हे गायब असल्यामुळे तपास यंत्रणांशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान जेएमएमने सोरेन यांच्या विरोधातील ईडीकडून सुरु असणारी चौकशी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

याबद्दल जेएमएमचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य म्हणाले, मुख्यमंत्री सोरेन हे काही वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेले होते आणि ते परत येतील. पण, ईडीची कारवाई अनाकलनीय आणि घटनाबाह्य आहे. हे पाऊल राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. सोरेन यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, सोरेन यांच्या निवासस्थान, राजभवन आणि रांची येथील ईडी कार्यालयाच्या १०० मीटरच्या परिघात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

Exit mobile version