जम्मू काश्मीरमध्ये प्राणार्पण केलेल्या हरमिंदर यांचा मुलगा झाला लेफ्टनंट

मुलाने १८ ग्रेनेडियर्समधून अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली होती

जम्मू काश्मीरमध्ये प्राणार्पण केलेल्या हरमिंदर यांचा मुलगा झाला लेफ्टनंट

२३ वर्षांपूर्वी वडिलांनी ‘बेबी बुक’मध्ये दिलेले वचन पाळत मोहालीचा नवतेश्‍वर सिंग शनिवारी लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू झाला. एप्रिल १९९९मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या मेजर हरमिंदर सिंग यांनी मुलाने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

वडिलांच्या मृत्यूच्या केवळ तीन महिने आधी जन्मलेल्या लेफ्टनंट नवतेश्‍वरने आईच्या सुरुवातीच्या विरोधाला न जुमानता देशसेवेसाठी समर्पित कुटुंबाच्या वारशाचा सन्मान करत देशसेवेला वाहून घेण्याचा मार्ग चोखाळला. सिंग यांचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून देशाची सेवा करत आहेत. लेफ्टनंट नवतेश्‍वर यांचे आजोबा कॅप्टन हरपाल सिंग यांनी तोफखाना रेजिमेंटमध्ये सेवा बजावली. तर, मेजर हरमिंदर सिंग यांनी काश्‍मीरमधील दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करले. या त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल मेजर हरमिंदर यांना मरणोत्तर शौर्य चक्र हा देशाचा तिसरा-सर्वोच्च शौर्य सन्मान प्रदान करण्यात आला.

 

लेफ्टनंट नवतेश्‍वर यांनी चंडिगड येथील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची १८ ग्रेनेडियर्स या रेजिमेंटमध्ये भरती करण्यात आली होती. विशेष म्हणजे नवतेश्वर यांच्या वडिलांनी याच रेजिमेंटमध्ये ऑफिसर ट्रेनिंग अकादमीमधून चांगल्या गुणांनी पदवी प्राप्त केली होती.

हे ही वाचा:

४६ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

नंदुरबारला आता आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी

 हिंदू असल्याचा आपल्याला अभिमान

मिर्चीचा ठेचा आणि भाकरी ठाकरेंना पचेल काय ?

 

पदवीदान समारंभात कुटुंबातील अनेक सदस्यांनी हजेरी लावली. हा संपूर्ण कुटुंबासाठी एक अतिशय भावनिक क्षण होता. नवतेश्वर सिंग यांचे वडील वारले तेव्हा ते अवघे २९ वर्षांचे होते. त्यामुळे त्यांची पत्नी आणि नवतेश्वरची आई रुपिंदर पाल कौर यांचा सुरुवातीला नवतेश्वर यांना लष्करात पाठवण्यास विरोध होता. तथापि, लेफ्टनंट नवतेश्‍वर यांनी जिद्द सोडली नाही. त्यांचे वडील मेजर हरमिंदर सिंग यांनी ‘बेबु बुक’मध्ये आपल्या मुलाने १८ ग्रेनेडियर्समधून अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

 

मेजर हरमिंदर खूप कमी वेळच आपल्या मुलाला डोळे भरून पाहू शकले. नवतेश्वर अवघा एक महिन्याचा असताना हरमिंदर यांना काश्मीर खोऱ्यात कर्तव्य बजावण्यासाठी जावे लागले. त्यांची तुकडी बारामुल्ला येथे तैनात करण्यात आली होती. श्रीनगरच्या उत्तरेला सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या सुदारकुट बाला गावात दहशतवादी असल्याची माहिती या तुकडीला मिळाली. दहशतवाद्यांशी लढताना त्यांना प्राण गमवावे लागले होते.

Exit mobile version