टक्केवारीच्या मोहामायी महापालिकेने मुंबईकरांच्या सोयीसुविधांचा बोजवारा उडवलाय. नालेसफाईची कामे झालीच नाहीत, म्हणून अनेक विभागांमध्ये तक्रारींची मालिका सुरुच आहे. ते कमी नाही तोपर्यंत भांडुपमध्ये कंत्राटदाराच्या मस्तवालपणाचे अजून एक उदाहरण समोर आले आहे.
भांडुपमधील एका कंत्राटदाराने नालेसफाईचा कचरा एका नाल्यातून दुसरीकडे नाल्याजवळ टाकण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे. नाल्यातून काढलेला कचरा विल्हेवाट न लावता दुसऱ्या नाल्याशेजारी टाकून एकप्रकारे जनतेला मूर्ख बनवण्याचेच काम या कंत्राटदाराने केलेले आहे. या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलिन डी यांनी केलेली आहे.
हे ही वाचा:
मेसीच्या अर्जेंटिनासमोर उरुग्वे ढेर
मुख्यमंत्री लवकरच घराबाहेर पडणार
भांडुप पूर्वेकडील चामुंडानगर नाल्याजवळ गाळाचा कचरा टाकण्यात येत होता. रहिवाशी तसेच स्टॅलिन यांच्या हे निदर्शनास आल्यावर त्यांनी हा नेमका प्रकार काय आहे याची चौकशी केली. या चौकशीअंती कंत्राटदाराने केलेले हे कृत्य उघडकीस आले.
कंत्राटदाराचा मस्तवालपणामागे महापालिकेचा आशीर्वाद हेच मुख्य कारण आहे. या प्रकरणाची विचारपूस केली असता केवळ उडवाउडवीच्या उत्तरांशिवाय काहीच ऐकायला मिळाले नाही. नाला साफ न करता दुसरीकडील कचरा तेथे आणून टाकला म्हणजे नालेसफाई झाली हेच दाखविण्याचा हा डाव होता. या कंत्राटदारावर कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव असल्याचेही आता समोर आलेले आहे. एकूणच काय तर टक्केवारीची ही गणिते सामान्य माणसाला मात्र डोईजड झालेली आहेत. महापालिका प्रशासन अनभिज्ञ असल्यासारखे सर्व गोष्टी केवळ पाहात आहेत. सर्वसामान्यांना होणारे त्रास आणि त्यांची हाल याच्याशी त्यांना काहीच देणे-घेणे नाही हे आता सिद्धच झालेले आहे.
वास्तविक पाहता नालेसफाई हे काम पावसाआधीचे आहे. पावसाळ्याआधीच ही कामे पूर्ण व्हायला हवीत. परंतु आता पावसाळा सुरू होऊनही नालेसफाईची कामे अनेक विभागांमध्ये अपूर्ण असल्याचे सत्य आता समोर आलेले आहे.