जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कांदिखास भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका ४५ वर्षीय नागरिकावर गोळीबार करून त्याची हत्या केली आहे. कुपवाडा येथील हंदवाडा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रसूल मगरे असे मृत नागरिकाचे नाव आहे. सुरक्षा दलांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल तैनात आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांचा तपास सुरु आहे. सुरक्षा दल सर्व ठिकाणी नजर ठेवून आहे. अशातच कुपवाडा जिल्ह्यातील कांदिखास भागात एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या पोटात आणि डाव्या मनगटात गोळ्या लागल्या होत्या. गोळीबाराची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला.
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रसूल मगरे असे मृत नागरिकाचे नाव आहे. मृत रसूल मगरे हे एक सामाजिक कार्यकर्ता होते. परंतु, बंदूकधारी लोकांनी सामाजिक कार्यकर्त्याला का लक्ष्य केले?, हे स्पष्ट झालेले नाही. याचा तपास सुरु आहे.
हे ही वाचा :
आता “मेक इन इंडिया” जागतिक स्तरावर
चार मुस्लिम मुलांसाठी एनएसएस शिबिरात हिंदू विद्यार्थ्यांवर नमाज पठणाची सक्ती!
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रतीत्युत्तर
पहलगाम हल्ला : अभिनेता अर्जुन बिजलानीने काय घेतला निर्णय?
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल हाय अलर्टवर आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. याच मोहिमेदरम्यान पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी (एलईटी) संबंधित तीन दहशतवादी साथीदारांना नुकतेच बांदीपोरा येथील एका चौकीवर अटक करण्यात आली होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून एक चिनी पिस्तूल, दोन मॅगझिन, अनेक राउंड आणि हँडग्रेनेड जप्त केले.