… म्हणून मुनव्वर फारुकीने मराठी माणसांची मागितली माफी!

माफी मागतानाचा व्हिडीओ केला पोस्ट

… म्हणून मुनव्वर फारुकीने मराठी माणसांची मागितली माफी!

स्टॅन्डअप कॉमेडियन आणि बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी हा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत असतो. आता आणखी एकदा त्याने केलेल्या विधानामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्टॅन्ड अप कॉमेडी करताना ‘क्राऊड वर्क’ केले जात असताना मुनव्वर फारुकी याने मराठी माणसाचा अपमान केल्याची बाब समोर आली होती. यावरून नाराजी व्यक्त केली जात असताना आता मुनव्वर फारुकी याने जाहीर माफी मागितली आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मुनव्वर फारुकीने त्याच्या मुंबईत आयोजित स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना विचारलं की “तुम्ही सर्वजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातूनच आलेले आहात का? कोणी लांबचा प्रवास करून इथे आलंय का?” त्यावर प्रेक्षकांमधून कोणीतरी होकारार्थी उत्तर दिलं. त्यावर फारुकीने विचारलं, “कुठून आलात?” त्यावर समोरून उत्तर आलं, “तळोजा, मुंबईबाहेरून आलोय”. यावर फारुकी म्हणाला, “हे लोक आज सांगतायत की प्रवास करून आलोय, अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात, कुठे राहता? तेव्हा हेच लोक त्यांच्या गाववाल्यांना सांगतात, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक सगळ्यांना *** बनवतात.” मुनव्वर फारुकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांनी त्याला इशारा दिला होता. प्रकरण तापल्याचे लक्षात येताच मुनव्वर फारुकीने झाल्या प्रकरणाची माफी मागितली आहे.

त्याने माफी मागतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “या व्हिडीओतून काही गोष्टी स्पष्ट करायला आलो आहे. एक शो केला त्यामध्ये क्राऊड वर्क म्हणजेच लोकांशी संवाद साधत होतो. त्यात कोकणाचा विषय निघाला. तळोजामध्ये कोकणी लोक राहतात मला ठाऊक आहे. कारण माझे अनेक मित्र तिथे राहतात. मात्र जे बोललो ते जरा संदर्भ सोडून झालं. मी कोकणाची खिल्ली उडवली असं अनेकांना वाटलं. मात्र माझा तो हेतू मुळीच नव्हता. मी आत्ताही तेच सांगू इच्छितो की क्राऊड वर्कमध्ये मी बोलून गेलो. मात्र मी पाहिलं की लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी कॉमेडियन आहे. माझं काम लोकांना हसवणं आहे दुखवणं नाही. त्यामुळे मी मनापासून जे दुखावले गेलेत त्यांची माफी मागतो. सॉरी माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या मी त्यांची माफी मागतो. इंटरनेटवर जोक व्हायरल झाला आहे. मात्र मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र” असं म्हणत मुनव्वरने माफी मागितली आहे.

हे ही वाचा:

भारतीय मार्केटवर हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम ‘फुस्स’

बंगालच्या सीमेवर बांगलादेशी तस्करांचा बीएसएफ जवानांवर हल्ला, कारवाईत एक ठार !

ठाकरेंचे लोणचे घालण्याची प्रक्रिया सुरू!

महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ कार्यरत

भाजपा आमदार नितेश राणेंनी हा व्हिडीओ पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की, मुनव्वर फारुकी फटके खाण्याआधी सरळ झाला. यापुढे मराठी माणूस, कोकणी माणूस किंवा हिंदूंबाबत काही बोललास तर थेट ऍक्शन होईल.

Exit mobile version