नाट्यसंगीत गायक पंडित रामदास कामत यांचे निधन

नाट्यसंगीत गायक पंडित रामदास कामत यांचे निधन

संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार तसेच मराठी नाट्यसंगीताचा वारसा अखंडपणे जपणारे ज्येष्ठ गायक पंडित रामदास कामत यांचे रविवारी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. विलेपार्ले येथे त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

कामत यांच्या पश्चात मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून, नातू असा परिवार आहे. अंधेरीतील पारसीवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार होते.

रामदास कामत हे मूळचे गोव्याचे होते. नाट्यसंगीत रंगभूमीवर ऐन बहरात असताना त्यांनीही संगीत नाटक केले. गोपीनाथ सावकार, मास्टर दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर, मो. ग. रांगणेकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी काम केले. धी गोवा हिंदू असोसिएशन, गोपीनाथ सावकार कलामंदिर, मुंबई मराठी नाट्यसंघ, रंगशारदा, भरत नाट्यमंदिर, मराठी रंगभूमी ते चंद्रलेखा अशा विविध संस्थासोबतही त्यांनी काम केले. श्रीरंगा कमला कांता, पूर्वेच्या देवा तुझे, देवा तुझा मी सोनार, जन विजन झाले, अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे ही त्यांची गाणी आजही लोकांच्या मनात स्थान मिळवून आहेत. कामत यांनी २००९मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले होते. २०१५मध्ये त्यांना तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा:

ये तेरा घर ये मेरा घर…

‘सुली डील्स’च्या मास्टरमाइंडला अटक

धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी

… म्हणून पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द

 

मूळचे गोव्याचे असल्यामुळे कामत यांचे लहानपणापासूनच संगीताशी अतूट नाते तयार झाले. लहानपणी त्यांनी आपले वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरविले. नाट्यसंगीताचे शिक्षण घेतले. पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, गोविंद बुवा अग्नी, प्रभाकर पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर यांच्याकडून त्यांनी नाट्यसंगीताचे प्रशिक्षण घेतले. यशवंत देव यांच्याकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले. त्यांच्या नाट्यसंगीत रंगभूमीवरील कारकीर्द संगीत संशय कल्लोळ या नाटकाने झाली. मग संगीत शारदा, संगीत सौभद्र, संगीत मानापमान, संगीत मदनाची मंजिरी, संगीत एकच प्याला, संगीत मंदारमाला, संगीत होनाजी बाळा अशी अनेक संगीतनाटकांमधून त्यांनी काम केले.

Exit mobile version