सलग दुसऱ्या सामन्यात शानदार शतक ठोकून विक्रम करणाऱ्या अष्टपैलू स्मृती मंधानाने गोलंदाजीतही चमक दाखवून दुसऱ्याच चेंडूवर विकेट घेण्याची करामत केली. बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान दुसरा सामना रंगला.
पहिल्यांदा फलंदाजी घेऊन टीम इंडियाने हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्या शानदार शतकांच्या जोरावर तीन बाद ३२५ अशी मोठी धावसंख्या उभारली. हे मोठे लक्ष्य गाठताना पाहुण्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी पहिल्या तीन विकेट ६७ धावांवरच गमावल्या. यातलीच एक विकेट स्मृती मंधवाना हिने घेतली.
पहिल्या सत्रात शानदार शतक ठोकल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने दिग्गज खेळाडूंकडून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय योग्य ठरला. मंधाना हिने तिच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर लूसची विकेट घेऊन भारताला मोठा दिलासा दिला. मंधाना हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच गोलंदाजी केली आणि सुने लूसच्या रूपात मोठी विकेट मिळवली. मंधानाने दोन षटकांत १३ धावा देऊन एक विकेट पटकावली.
सुने लूसची विकेट घेतल्यानंतर स्मृती मंधाना हिने मैदानात जल्लोष केला. सर्व भारतीय क्रिकेटपटू या जल्लोषात सहभागी झाले. आफ्रिकेच्या संघाविरोधात स्मृतीची बॅटही तळपली. तिने या सामन्यात १२० चेडूंमध्ये १८ चौकार व दोन षटकार ठोकून १३६ धावा केल्या. तर, हरमनप्रीत कौर हिने ८८ चेंडूंत नऊ चौकार व तीन षटकारांसह १०३ धावा केल्या.
हे ही वाचा..
पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!
कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला श्रद्धांजली
स्मृती मंधाना हिने या मालिकेत सलग दुसरे शतक ठोकले. तिने पहिल्या सामन्यात ११७ धावांची खेळी केली. त्यानंतर सलग दोन शतकांच्या मदतीने मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सात शतके केल्याचा विक्रम मिताली राजच्या नावे आहे. या विक्रमाशी स्मृतीने बरोबरी केली. स्मृती मंधाना हिने ही कामगिरी अवघ्या ८४व्या सामन्यांत केली आहे. तर, मिताली राजने २११ सामन्यांत ही कामगिरी केली.