उरणजवळच्या करंजा खोपटा खाडीनजीक बांधण्यात येत असलेल्या खासगी बंदराकरिता संबंधित कंपनीने किनाऱ्यावरील खारफुटीच्या शंभरहून अधिक झाडांची कत्तल केल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. याबद्दल कुणाला काहीही समजू नये म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका बोटीतून ही तोडलेली खारफुटी खोल समुद्रात नेऊन फेकण्यात आली.
या प्रकरणाचे पुरावे सादर केले असूनही पोलिसांनी संबंधित कंपनीऐवजी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. यामुळे सरकारी यंत्रणेच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक मच्छीमार व सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी याबाबतचे पुरावे सादर केले आहेत.
उरण समुद्र किनाऱ्यावर करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीमार्फत खासगी बंदर विकसित करण्यात येत आहे. बांधकामादरम्यान कंपनीने मोठ्या प्रमाणात खारफुटीची तोड केल्याच्या तक्रारी स्थानिक मच्छीमारांनी केल्या होत्या. त्यानंतर उरण सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता कंपनीच्या पूर्वेकडील धक्क्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खारफुटी तोडल्याचे आढळले. तोडलेली खारफुटी समुद्रात फेकण्यात आल्याचे समोर आले. तसेच धक्क्यालगत खारफुटीचे तोडलेले शंभर बुंधेही आढळून आले.
हे ही वाचा:
आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तेवर टाच
‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’
धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!
‘१०० कोटींपैकी पवार, उद्धव यांच्या खात्यात किती गेले?’
खारफुटीची तोडलेली झाडे दोरखंडाला बांधून बोटीच्या साह्याने समुद्रात खोलवर नेऊन फेकण्यात येत असताना स्थानिक मच्छीमारांनी त्याचे छायाचित्रण आणि चित्रीकरण करून हे सर्व पुरावे रायगड जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस तसेच वनविभागाकडे पाठवले. मात्र, उरणच्या तहसीलदारांनी पोलिसांत कंपनीऐवजी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.
पोलीस आणि महसूल विभागाच्या यंत्रणा पाठराखण करीत असल्याने कंपनी महिनाभरापासून खारफुटीची तोड करीत असल्याचा आरोप उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. मच्छीमार आणि पयार्वरणाच्या सुरक्षेसाठी संस्थेने उरणच्या तहसीलदारांच्या विरोधात उच्च न्यायालयात व हरित लवादाकडे दाद मागण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
किनाऱ्यावरची खारफुटी समुद्रात ओढून नेण्यात येत असल्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान झाले आहे. बंदर उभारणीसाठी कंपनीने किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भराव केला असून त्यामुळे परिसरातील जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मिळालेल्या चित्रफितीच्या आधारे एका व्यक्तीविरोधात संशयित म्हणून तक्रार करण्यात आली. पोलीस त्याची ओळख पटवण्याचे काम करत आहेत, अशी माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. खारफुटी तोडप्रकरणी संशयित व्यक्तीची ओळख पटली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी सांगितले.