‘जे तरुण मोदी मोदी असा गजर करतात, त्यांच्या कानशिलात लगावली पाहिजे,’ असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज थंगडागी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपने निवडणूक समितीकडे तक्रार केली आहे.
कोप्पल येथे निवडणूक प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. ‘ते (भाजप) आता त्यांची निवडणूक मोहीम घेऊन येत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. ते कशाच्या जोरावर मत मागत आहेत? त्यांनी दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते दिले का? जेव्हा तरुण रोजगाराची मागणी करतात तेव्हा ते त्यांना भजी विकायला सांगतात. त्यांना याची लाज वाटली पाहिजे,’ असे थंगडागी म्हणाले. ‘इतके होऊनही जर विद्यार्थी ‘मोदी मोदी’ असा गजर करत असतील तर त्यांच्या कानशिलातच लगावली पाहिजे,’ असे ते म्हणाले.
काँग्रेसनेत्याच्या या वादग्रस्त विधानावर भाजपनेते अमित मालवीय यांनीही जोरदार टीका केली आहे. जे नेते तरुणांना लक्ष्य करतात ते टिकू शकणार नाहीत, अशी प्रतिक्रिया मालवीय यांनी दिली. ‘जे विद्यार्थी केवळ मोदी यांच्या नावाचा गजर करतात, त्यांच्या कानशिलात मारण्याच्या गोष्टी कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री शिवराज थंगडागी करतात. का तर भारतातील तरुणांनी राहुल गांधी यांना पुन्हा पुन्हा नाकारले म्हणून? त्यांना पंतप्रधान मोदी यांनी देशाचे नेतृत्व करावेसे वाटते म्हणून काँग्रेस त्यांना मारणार का? ही लाजिरवाणी बाब आहे.
हे ही वाचा:
“भारत माता की जय, जय हिंद हे नारे रचणारे मुस्लीम होते”
सीबीआयकडून विझाग बंदरावर २५ हजार किलो कोकेन मिश्रित यीस्ट जप्त
काँग्रेसच्या सहाव्या यादीतून पाच उमेदवार जाहीर
केजरीवालनी खलिस्तानी चळवळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते!
पंतप्रधान मोदी ‘यंग इंडिया’मध्ये गुंतवणूक करत असताना राहुल गांधी यांची काँग्रेस त्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करत आहे,’ असे मालवीय म्हणाले. ‘तरुणांना लक्ष्य करणारा कोणताही राजकीय पक्ष टिकू शकलेला नाही. तरुणपिढी आपल्या सामूहिक आकांक्षा बाळगतात आणि आपल्या राष्ट्राचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली असते,’ असे मालवीय यांनी सांगितले. या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपने शिवराज थंगडागी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.