महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक… मुंबईत मिळत नाहीयेत रुग्णालयात खाटा, तर नागपूरात ऑक्सिजनची कमतरता

महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक… मुंबईत मिळत नाहीयेत रुग्णालयात खाटा, तर नागपूरात ऑक्सिजनची कमतरता

महाराष्ट्राची कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असून देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित जिह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. पण एकीकडे परिस्थिती इतकी गंभीर असताना महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे मात्र तीन तेरा वाजलेले दिसतात. एकीकडे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोना रुग्णांसाठी पुरेशा खाटा नाहीयेत तर उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांनी प्राण गमावले आहेत.

महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित दहा जिल्ह्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यात पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर अशा आठ जिल्ह्यांत महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्रातल्या या बिघडलेल्या कोरोना परिस्थितीबद्दल केंद्र सरकारकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सध्या निर्बंध कडक करण्यात आले असून सध्या राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लावण्यात आली आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण महाराष्ट्रातील परिस्थिती इति बिकट असूनही महाराष्ट्रात त्याला साजेशी आरोग्य सुविधा असल्याचे चिन्ह दिसत नाहीये.

मंगळवारी मुंबई महापालिकेने एक आदेश काढत मुंबईतील खासगी रुग्नालयांच्या ८०% खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोना रुग्णांना या खाटा महापालिकेच्या नियोजनातुन देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण मुंबईतील वाढती कोरोना रुग्णांची आकडेवारी बघता त्याला पुरेसे बेड्स मुंबईमध्ये उपलब्ध नाहीयेत. तर दुसरीकडे नागपूर आणि धुळे येथे ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. नागपूर मध्ये चार तर धुळ्यात तीन जणांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला आहे.

हे ही वाचा:

परमबीर यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

पुन्हा एकदा ऑनलाईन सुनावणी घ्यावी; बार असोसिएशनची विनंती

ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल

राजकीय नेतृत्वानेच केली वाझेची नियुक्ती…राऊतांनीच दिली पुष्टी

नागपूर शहरात सध्या ऑक्सिजनच्या साठ्यात प्रचंड कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजनची वाढत चाललेली मागणी आणि होत नसलेला पुरवठा. ३० तारखेला नागपूरमधील एका कोविड रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपला. त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमधील सगळ्या कोवीड रुग्णांना डिस्चार्ज दिला. त्यातले ११ रुग्ण हे अतिशय गंभीर होते. त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांची कमतरता अधोरेखित होत आहे. धुळ्यातील अंजना हार्ट हॉस्पिटलमध्येही अशाच प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने तीन रुगणांनी आपले प्राण गमावले आहेत.

राज्यात जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता त्याचा प्रमुख उद्देश हा राज्यात आरोग्य सुविधा आणि सोयी उभारण्यासाठी वेळ मिळावा हा होता. आज राज्यात दुसऱ्या लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांमध्ये काही वाढ झालेली दिसत नाहीये.

प्रथितयश उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील सोमवारी ही बाब अधोरेखित करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची बातमी शेअर करत महिंद्रा म्हणतात, “उद्धव ठाकरेजी लॉकडाऊनचा सर्वात जास्त त्रास हा छोटे उद्योग, कामगार आणि विस्थापित मजुरांना होतो. पहिल्यांदा करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उद्देशच मुळात रुग्णालये आणि आरोग्यसुविधा उभारणीसाठीचा वेळ मिळावा हा होता.”

Exit mobile version