मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यानंतर मंगळवारी याच मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप झाले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत १ जुलैला मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली तर मुख्यमंत्र्यांनी याला चोर कोतवाल को डाँटे असे प्रत्युत्तर दिले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तर चोराच्या उलट्या बोंबा आहेत असे म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, कॅगच्या अहवालात काहीही नाही. कोणतीही गोष्ट टेंडरशिवाय झालेली नाही. पंतप्रधान निधीवर ज्यांनी जाब विचारला नाही, महापालिकेबाबत विचारत आहेत. महापालिकेच्या खर्चावर त्यांचं लक्ष होतं. पण तिथे कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. चोर चोर अशी ओरड केल्यावर लोक दुसऱ्याकडे पाहतात. चोराच्या उलट्या बोंबा असे याला म्हणतात.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खर्च नेमका कुठे केला गेला याचा हिशेब विचारला जाणार आहे. एसआयटी जाहीर झाली आहे, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण दिशाभूल होणार नाही. दूध का दूध पानी का पानी होणार. उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी खरे तर त्यांची स्थिती आहे. आमचे पुस्तक मात्र खुले आहे.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महानगरपालिकेत साडेबारा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. कॅगने आपल्या रिपोर्टमध्ये सुतोवाच केले. आता त्यांच्यावर एसआयटी लावली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता यासाठी एसआयटी जाहीर केली आहे. त्यातून अनेक लोकांचे बुरखे फाटणार आहेत, दोन अडीच वर्षात जी गँग उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांचे काही खरे नाही. हे लक्षात आल्यामुळे हा मोर्चा काढला जात आहे. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणता येईल.
हे ही वाचा:
तलवारबाज भवानीला जयललितांनी दिला होता मदतीचा हात !
देवेंद्र फडणवीस म्हणाले; बंजारा समाजाच्या विकासासाठी सरकार सदैव पाठीशी !
फाल्कन्सनी पटकावले मुंबई प्रीमियर लीग टेबलटेनिसचे विजेतेपद
ठरलं! या दिवशी श्री राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार
दरम्यान, ठाकरे गट १ जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत ठाकरे गटातील माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई महानगर पालिकेच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गट हा मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे, असे उत्तर याबाबतच्या एसआयटीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिले.
त्याआधी, मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. मुंबईत महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये १२ हजार २४ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचे महालेखापालने (कॅग) विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे भाजपा आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते.